IND vs NZ Rahul Gandhi Mohammad Shami: भारताने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्ध सात विकेट्स घेत पराक्रम नोंदवला. संपूर्ण देश मोहम्मद शमीच्या अद्भुत खेळीचा आनंद साजरा करताना काँग्रेस नेते श्रीनिवास बी.व्ही. यांनी २०२१ मधील भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या पराभवासाठी शमीला ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे. बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात शमीच्या कामगिरीने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. याशिवाय शमीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सामन्याच्या नंतर बोलताना शमी म्हणाला की, “मी या संधीची दीर्घकाळ वाट पाहत होतो, आता माहित नाही पुन्हा आयुष्यात विश्वचषक खेळण्याची संधी मिळेल की नाही, त्यामुळे ही संधी माझ्यासाठी मोठी होती.”
शमीच्या या पराक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी त्याचे कौतुक केले होते. तर काँग्रेस नेते श्रीनिवास बी.व्ही. यांनी ट्वीट करत लिहिले की, “जेव्हा ‘हिंदू-मुस्लिम’ वादाच्या नशेत लोकांनी मोहम्मद शमीवर ताशेरे ओढले तेव्हा राहुल गांधी एकटे शमीच्या पाठीशी उभे होते.” श्रीनिवास यांनी राहुल गांधींच्या २०२१ च्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते की, “मोहम्मद शमी आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत. हे लोक द्वेषाने भरलेले आहेत कारण त्यांना कोणीही प्रेम देत नाही. त्यांना क्षमा करा.”
२०२१ मध्ये टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारत पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर सोशल मीडिया ट्रोल्सने शमीला त्याच्या धर्मावरून बरंच सुनावलं होतं. राहुल गांधींव्यतिरिक्त, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या ट्रोलिंगचा प्रत्यक्ष निषेध करत तेव्हा शमीला पाठिंबा दर्शवला होता.
दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीनंतर राहुल गांधींनी पुन्हा एकदा काल शमीसाठी खास पोस्ट लिहिली होती, राहुल गांधी म्हणाले की, “मॅन ऑफ द मॅच, मोहम्मद शमीची शानदार गोलंदाजी! त्याच्या सातत्यपूर्ण सामना जिंकणाऱ्या कामगिरीने त्याला या विश्वचषकात उत्कृष्ट खेळाडू बनवले आहे. “
राहुल गांधी ट्वीट
हे ही वाचा<< “विराट कोहलीचे दिवंगत वडील..”, युवराज सिंगची कोहलीसाठी भावुक पोस्ट; चाहते म्हणतात, “नशिबात..”
दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याविषयी बोलायचे झाल्यास, फलंदाजी करताना रोहित शर्मा, गिल, कोहली, श्रेयस अय्यर, के. एल राहुलने ३९७ धावांचा डोंगर उभारला होता. गोलंदाजीत सुरुवातीलाच शमीने दोन विकेट्स घेतल्या पण त्यानंतर मिचेलची शतकी खेळी, त्यात विल्यमसनची तगडी साथ यामुळे भारतीय गोलंदाजांचे धाबे दणाणले होते पण शमीने पुन्हा आपले श्रेष्ठत्व सिद्ध करून शेवटच्या १० षटकांमध्ये तब्बल पाच विकेट घेतल्या. त्याबरोबरच सिराज, कुलदीप, बुमराहने प्रत्येकी एक विकेट घेत ७० धावांनी भारताला विजय मिळवून दिला.