IND vs AUS Mohammad Siraj Crying: अहमदाबाद इथे झालेल्या वर्ल्डकप २०२३च्या अंतिम मुकाबल्यात धडाकेबाज सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने १३७ धावांसह ऑस्ट्रेलियाला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया २००३ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचले होते, त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली होती. आता भारतीय संघाकडे या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी होती पण अत्यंत निराशाजनक पद्धतीने भारतीय संघाच्या हातून हि संधी निसटली आहे. संपूर्ण विश्वचषकात एकही सामना न हरलेल्या भारताला आज सहा विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व एकूण सर्वच खेळाडू मैदानात हताश दिसून आले. शेवटच्या षटकात गोलंदाजी करत असणाऱ्या मोहम्मद सिराजला तर या पराभवानंतर अश्रूच आवरता आले नाहीत.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आवश्यक असलेल्या दोन धावा घेताना मॅक्सवेलने जेव्हा बॉलला भिरकावले तेव्हाच मोहम्मद सिराजचे डोळे भरून आले होते व एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाचं सेलिब्रेशन सुरु होताच मोहम्मद सिराज रडताना दिसून आला. यावेळी जसप्रीत बुमराह सुद्धा त्याला समजावताना दिसून आला. पण सर्वांच्याच चेहऱ्यावरील निराशा ही स्पष्ट दिसत होती.
मोहम्मद सिराजचे अश्रू ओघळले
हे ही वाचा<< मॅक्सवेलने फेकलेला बॉल कोहलीच्या डोक्याजवळ, तितक्यात..विराट कोहलीचा जाब विचारताना Vid…
दरम्यान, ऑस्ट्रेलियाला दणदणीत विजयासह सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाी २४१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा करुन सामना जिंकला आहे. यासह भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झाले आहे पण एकूण प्रवास पाहता भारतीय संघासाठी ही स्पर्धा सर्वाधिक यशस्वी ठरली होती.