Mohammad Siraj on India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिला सामना आज २७ जुलै रोजी बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून तो भारतात परतल्याची बातमी समोर येत आहे. मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत या दौऱ्यावर सिराज हा भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळत होता. परंतु आगामी आशिया कप आणि विश्वचषक २०२३ सारख्या मोठ्या स्पर्धा लक्षात घेऊन त्याच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सिराजने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत कारकिर्दीतीत दुसऱ्यांदा पाच विकेट्स (फाइव्ह विकेट हॉल) घेतल्या. ही मालिका भारताने १-० अशी जिंकली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, मोहम्मद सिराज कसोटी संघाचा भाग असलेल्या आर. अश्विन, के.एस. भरत, अजिंक्य रहाणे आणि नवदीप सैनी यांच्यासह मायदेशी परतला आहे. त्यांच्यावरील वर्कलोड मॅनेजमेंटमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताला ५ सामन्यांची टी२० मालिकाही खेळायची आहे, परंतु सिराज टी२० संघाचा भाग नाही. मात्र, मोहम्मद सिराजच्या जागी बीसीसीआयने अद्याप घोषणा केलेली नाही.

हेही वाचा: IND vs WI 1st ODI: संजू सॅमसन की सूर्यकुमार? वेस्ट इंडीजविरुद्ध प्लेईंग ११ निवडण्याचे रोहित शर्मासमोर असेल आव्हान, जाणून घ्या

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताच्या ताफ्यात आता उमरान मलिक, हार्दिक पांड्या, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर हे वेगवान गोलंदाज आहेत. सिराजच्या अनुपस्थितीत ते टीम इंडियाची धुरा सांभाळतील. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारताला आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. सिराज या मालिकेतही खेळणार नाही. मात्र यानंतर तो सलग तीन महिने अ‍ॅक्शनमध्ये दिसणार आहे. आशिया कप २०२३ ऑगस्टच्या अखेरीस सुरू होईल, त्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळेल. त्याचबरोबर भारत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विश्वचषक खेळणार आहे. या सर्व मालिकांमध्ये तो खेळताना दिसणार आहे.

हेही वाचा: Asian Games 2023: फुटबॉल चाहत्यांसाठी खुशखबर! आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रीडा मंत्रालयाचा हिरवा झेंडा

मोहम्मद सिराजने पोर्ट-ऑफ-स्पेन येथे सपाट खेळपट्टीवर पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. त्याने दोन कसोटी सामन्यांमध्ये मिळून एकूण सात विकेट्स घेतल्या. या दौऱ्यापूर्वी, तो ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा भाग होता, ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. आयपीएलमध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना शानदार कामगिरी केली होती. त्याने आयपीएल २०२३मध्ये १४ सामन्यांमध्ये तब्बल १९ विकेट्स घेतल्या. तो आरसीबीच्या संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा त्या हंगामातील खेळाडू ठरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad siraj will not play odi series against west indies big reason revealed avw