भारत विरुद्ध बांगलादेश संघातील दोन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेनंतर टीम इंडिया भारतात दाखल झाली आहे. अशात मोहम्मद सिराजचा बांगलादेशहून परतताना एअर विस्तारा एअरलाइन्सचा प्रवास करण्याचा अनुभव चांगला नव्हता. टीम इंडियासोबत बांगलादेश दौऱ्यावर गेलेला सिराज भारतात परतला, तेव्हा त्याचे सामान हरवले आहे. याबाबत सिराजने ट्विट करुन माहिती दिली.
मोहम्मद सिराजने एअरलाइन्सला त्याचे सामान परत मिळवून देण्याची विनंती केली आहे. कारण त्यात त्याच्या सर्व आवश्यक गोष्टी होत्या. सिराजने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सहा विकेट्स आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतासाठी सात विकेट्स घेतल्या आहेत.
सिराजने ट्विट करताना लिहिले की, ‘त्यात माझ्या सर्व महत्वाच्या वस्तू होत्या, मी तुम्हाला विनंती करतो की, आवश्यक प्रक्रिया करून लवकरात लवकर मला हैदराबादमध्ये साहित्य उपलब्ध करून द्या.’ यावर एअरलाइन्सनेही उत्तर दिले आणि लवकरात लवकर सामानाची माहिती देण्याचे सांगितले.
एअरलाइन्सनेही उत्तर देताना म्हटले, ‘हॅलो मिस्टर सिराज, हे दुर्दैवी वाटते. कृपया लक्षात घ्या की आमचे कर्मचारी तुमचा साहित्य शोधण्यासाठी आणि तुम्हाला शक्य तितक्या लवकर अपडेट करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करतील. कृपया तुमचा संपर्क क्रमांक शेअर करा आणि आम्हाला तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी डीएमद्वारे सोयीस्कर वेळ द्या.’
भारतीय संघ डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. भारताने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने गमावली, तर दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली. सिराजबद्दल बोलायचे तर त्याने भारतासाठी एकूण १५ कसोटी, १६ एकदिवसीय आणि आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सिराजने तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे ४६, २४ आणि ११ विकेट घेतल्या आहेत.
भारताला ३ जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. सिराज एकदिवसीय संघाचा भाग आहे, तर त्याला टी-२० संघात स्थान मिळालेले नाही.