Mohammed Azharuddin Name Removed From Hyderabad Stadium Stand : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे एथिक्स ऑफिसर व लोकपाल व्ही. ईश्वरैय्या यांनी अलीकडेच एक आदेश जारी केला होता, या आदेशात म्हटलं होतं की मोहम्मद अझरुद्दीन (माजी भारतीय क्रिकेटपटू) यांचं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील नॉर्थ पव्हेलियनला दिलेलं नाव हटवण्यात यावं. एचसीएचे माजी अध्यक्ष असलेल्या अझरुद्दीन यांच्याविरोधात हा आदेश काढण्यात आला होता. लॉड्स क्रिकेट क्लबने दाखल केलेल्या याचिकेनंतर एचसीएने हा निर्णय घेतला आहे.

मोहम्मद अझरुद्दीन यांनी ते हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना २५ नोव्हेंबर २०१९ रोजी अ‍ॅपेक्स काउन्सिलची बैठक बोलावली होती. ते स्वतःच या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. स्टेडियममधील नॉर्थ पव्हेलियन, जे की पूर्वी व्ही. व्ही. एस. लक्ष्मणच्या (माजी भारतीय क्रिकेटपटू) नावाने ओळखलं जात होतं. त्या पव्हेलियनला मोहम्मद अझरुद्दीन स्वतःचंच नाव दिलं. त्यांनी तसा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यानंतर शहरातील एलसीसी क्रिकेट अकादमीने या निर्णयावर आक्षेप घेतला. तसेच २८ फेब्रुवारी रोजी त्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर याप्रकरणी आता एचसीएने कठोर निर्णय घेतला आहे.

मोहम्मद अझरुद्दीन यांनी एचसीएचे अध्यक्ष असताना घेतलेला तो निर्णय मेमोरँडम ऑफ असोसिएशनचं उल्लंघन असल्याचा निर्वाळा क्लबने दिला आहे. क्लबचं म्हणणं आहे की क्लबचा कोणताही सदस्य कोणत्याही वास्तूला स्वतःचं नाव देऊ शकत नाही किंवा स्वतःच्या बाजूने कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.

मोहम्मद अझरुद्दीन उच्च न्यायालयात दाद मागणार

लोकपालांच्या आदेशावर मोहम्मद अझरुद्दीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दी हिंदूला दिलेल्या प्रतिक्रियेत अझरुद्दीन म्हणाले, “हा काही वैयक्तिक हितसंबंधांचा निर्णय नाही, मी लोकपालांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात जाईन. मला यावर भाष्य करायचं नाही. यावर भाष्य करण्यासाठी मला खाली जायचं नाही. मी तसं केल्यास क्रिकेट जगत त्यावर हसेल. मी १७ वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळलो. या १७ वर्षांच्या कारकिर्दीत मी १० वर्षे भारतीय संघाचं नेतृत्व केलं, तेही सन्मानाने. हैदराबादमधील क्रिकेटपटूंबरोबर अशा घटना घडत असतात. हे खूप दुःखद आहे. मी आता न्यायालयात दाद मागणार आहे. न्यायालय याबाबत योग्य तो निर्णय घेईल.