Mohammed Rizwan Bumps Shoulder Harshit Rana Video: क्रिकेटमधील हायव्होल्टेज लढत भारत-पाकिस्तान यांच्यात दुबईत सुरू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील या सामन्यात दोन्ही संघ कडवी टक्कर देत आहेत. पण भारतीय संघाने पाकिस्तानच्या धावांवर चांगलाच ब्रेक लावला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ सामन्यात गोलंदाजी करत आहे. यादरम्यान मोहम्मद रिझवानने धाव घेत असताना हर्षित राणाला धक्का मारल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पाकिस्तानने चांगली सुरूवात ८ षटकांत चौकार-षटकारांसह ३७ धावा केल्या होत्या. पण नवव्या षटकात बाबर आझम आणि १० व्या षटकात इमाम उल हक यांच्या विकेट्स गेल्या. यानंतर शकील आणि रिझवानची जोडी मैदानात आली पण त्यांना भारताच्या गोलंदाजांनी फार धावा करण्याची संधी दिली नाही. पहिल्या १० षटकांत पाकिस्तानने २ बाद ५२ धावा केल्या तर पुढच्या १० षटकांत फक्त २७ धावा केल्या.

यानंतर २१व्या षटकात हर्षित राणा गोलंदाजी करत होता. हर्षित राणाने या षटकात अवघ्या ३ धावा दिल्या. हर्षितने रिझवानविरूद्ध चांगली गोलंदाजी केली. या षटकातील अखेरच्या चेंडूवर रिझवानने फटका खेळला आणि धाव घेण्यासाठी गेला. तर हर्षित राणाने गोलंदाजी केल्यानंतर तो पुढे पिचवर जाऊन थांबला. यानंतर रिझवानने फटका खेळल्यानंतर त्याच्या नजरा चेंडूवर होत्या आणि त्याने जाता जाता हर्षितला धक्का दिला.

रिझवान धावता धावता चेंडू कुठे जात आहे हे पाहत होता आणि त्याने समोर हर्षितला पाहिलं नाही आणि त्याला थेट धक्का दिला. धक्का लागताच हर्षितही चांगलाच वैतागला होता आणि त्याने वळून त्याला काय असं म्हटल्याचं व्हीडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर रिझवान काहीच न बोलता त्यानंतर त्याची धाव पूर्ण करतो.

मोहम्मद रिझवान आणि सौद शकिल यांनी १०० अधिक धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यात सौद शकीलने आपले अर्धशतक केले. पण अक्षर पटेलने रिझवानला क्लीन बोल्ड करत पाकिस्तानच्या मोठ्या धावसंख्येच्या आशा मावळल्या. यानंतर हार्दिकच्या गोलंदाजीवर सौद शकील बाद झाला. यासह पाकिस्तानने ३५ षटकांत १६० धावा करत ४ विकेट्स गमावल्या आहेत.

Story img Loader