Mohammed Shami Apologize BCCI and Fans Post Viral: न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यावर आहे. २२ नोव्हेंबरपासून ही पाच सामन्यांची मालिका सुरू ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार आहे, ज्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारताने जाहीर केलेल्या १८ सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी देण्यात आलेली नाही. संघ जाहीर होण्यापूर्वी शमी दुखापतीनंतर तब्बल वर्षभरानंतर पुनरागमन करण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा होती. पण शमीची दुखापत काही पूर्णपणे बरी झालेली नाही. आता भारतीय संघात निवड न झाल्याने शमीने माफी मागत एक पोस्ट शेअर केली आहे.

शमीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओमध्ये शमी पुनरागमन करण्यासाठी ट्रेनिंग घेत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये, त्याने त्याच्या चाहत्यांची आणि बीसीसीआयची माफी मागितली आणि वचन दिले की तो लवकरच लाल चेंडू क्रिकेट खेळताना दिसेल.

हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…

मोहम्मद शमीने सोशल मीडियावर BCCI ची माफी का मागितली?

शमीने लिहिले, ‘मी माझ्या फिटनेसवर आणि गोलंदाजीसाठी फिट होण्यावर सतत काम करत आहे. सामन्याच्या तयारीसाठी आणि लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्यासाठी कठोर परिश्रम करत राहीन. मी सतत कठोर परिश्रम करत आहे आणि दिवसेंदिवस फिट होण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व क्रिकेट चाहते आणि BCCIची मी माफी मागतो. पण लवकरच मी लाल बॉल क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होत आहे, तुम्हा सर्वांना प्रेम.

मोहम्मद शमी गेला बराच काळ क्रिकेट मैदानापासून दूर आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे शमी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. या सामन्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली आणि नंतर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन करण्यात आले. आता शमीचे पुढील लक्ष्य बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी फिट होण्याचे आहे.

हेही वाचा – IND vs NZ: “…तर आता परिस्थिती वेगळी असती”, रोहित शर्माचे भारताने मालिका गमावल्यानंतर मोठे वक्तव्य, कोणावर फोडले पराभवाचे खापर?

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराझ खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.