विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. २२ नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल. या सामन्यासाठी भारतीय संघ सध्या कसून सराव करतो आहे. गेल्या काही मालिकांमध्ये भारतीय संघाचे गोलंदाज उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. मात्र भारताचा हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असल्यामुळे गुलाबी चेंडूवर भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने आपला सहकारी मोहम्मद शमीचं कौतुक केलं असून तो कोणत्याही खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरु शकतो असं म्हटलं आहे.
“सध्या शमी, इशांत आणि उमेश ज्या पद्धतीने खेळतायत, त्यानूसार गुलाबी चेंडू ही आता समस्या असूच शकत नाही. विशेषकरुन मोहम्मद शमी कोणत्याही खेळपट्टीवर प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरु शकतो. त्याच्या गोलंदाजीत वेग आहे आणि ते रिव्हर्स स्विंगही चांगला करतो.” गुलाबी चेंडूमुळे काही फरक पडेल का या प्रश्नावर साहा उत्तर देत होता. गुलाबी चेंडू सध्या कितपत वळतो आहे हे आम्ही तपासलेलं नाही मात्र हा मुद्दा आमच्या गोलंदाजांसाठी फारसा महत्वाचा आहे असं वाटत नसल्याचंही साहा म्हणाला.
अवश्य वाचा – Video : दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारत सज्ज, इडन गार्डन्स गुलाबी रंगात सजलं
भारतीय संघाने याआधी एकदाही आंतरराष्ट्रीय कसोटी सामना दिवस-रात्र स्वरुपात गुलाबी चेंडूवर खेळलेला नाहीये. भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये दुलिप करंडकाचा एक सामना गुलाबी चेंडूवर खेळवण्यात आला होता. ज्या सामन्यात साहा, शमी, रोहित शर्मा यासारखे खेळाडू होते. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या पुढाकारामुळे भारत आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळत आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे. इंदूर कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशवर १ डाव आणि १३० धावांनी मात केली. त्यामुळे ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतीय संघ बाजी मारतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.