IND vs BAN Match Updates in Marathi: मोहम्मद शमी मोठ्या कालावधीनंतर क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरला, पण शमीच्या गोलंदाजीत मात्र बदल झालेला नाही. वनडे वर्ल्डकप २०२३ मधील फॉर्मसह मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उतरला आहे. शमीने बांगलादेशविरूद्ध पहिल्या सामन्यात ३ विकेट्स घेत मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे.

विश्वचषकानंतर आपली पहिली आयसीसी टूर्नामेंट खेळणाऱ्या शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात ३ विकेट घेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० विकेट पूर्ण केले आहेत. यासह हा पराक्रम करणारा तो सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज ठरला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या दुबईत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी, शमीला २०० विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी ३ विकेट्स घेण्याची गरज होती. १२ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणाऱ्या शमीने अखेरीस हा टप्पा गाठलाच. पहिल्याच षटकात विकेट घेत या विक्रमाकडे एक पाऊल टाकले. त्यानंतर चौथ्या षटकात शमीनेही आश्चर्यकारक कामगिरी केली आणि बांगलादेशची तिसरी विकेट मिळवली, तर त्याच्या खात्यात दुसरी विकेट मिळवली.

मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेत २०० विकेट्स पूर्ण केले आहेत. शमी तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी चेंडूत २०० विकेट्स पूर्ण करणारा गोलंदाज बनला आहे आणि त्याने मिचेल स्टार्कचा विश्वविक्रम मोडला आहे. शमीने ५१२६ चेंडूत २०० वनडे विकेट घेतल्या आहेत. तर स्टार्कने ५२४० चेंडूत ही कामगिरी केली. आता शमीने सर्वात कमी चेंडूंमध्ये २०० वनडे विकेट घेण्याच्या बाबतीत जगभरातील सर्व गोलंदाजांना मागे टाकले आहे आणि पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

सर्वात कमी चेंडूत २०० वनडे विकेट घेणारे गोलंदाज

मोहम्मद शमी -५१२६ चेंडू
मिशेल स्टार्क – ५२४० चेंडू
सकलेन मुश्ताक -५४५१ चेंडू
ब्रेट ली – ५६४० चेंडू
ट्रेंट बोल्ट- ५७८३ चेंडू

सर्वात कमी सामन्यांमध्ये २०० वनडे विकेट्स घेणारे गोलंदाज

१०२ – मिचेल स्टार्क
१०४ मोहम्मद शमी/ सकलेन मुश्ताक
१०७ – ट्रेंट बोल्ट
११२ – ब्रेट ली
११७ – एलन डोनाल्ड

मोहम्मद शमी हा आयसीसी स्पर्धांमधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने आयसीसीच्या वनडे-टी-२० स्पर्धांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही केला. आतापर्यंत हा विक्रम माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानच्या नावावर होता, ज्याने विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ७१ विकेट घेतले होते. तर शमीने विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकूण ७३ विकेट घेत झहीरला मागे सोडले. शमीने केवळ ३३ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे.

Story img Loader