Mohammed Shami Roza Controversy: मोहम्मद शमी हा भारतीय संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आहे. शमीच्या भेदक गोलंदाजीच्या मदतीने भारतीय संघाने अनेक सामन्यांंमध्ये विजय मिळवला आहे. पण सध्याच्या घडीला मोहम्मद शमी वेगळ्याच वादात अडकला आहे. मोहम्मद शमीने रमजानचा महिना सुरू असतानाही रोजा (उपवास) न ठेवल्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे.

मुस्लिम धर्मामध्ये पवित्र मानला जाणारा रमजानचा महिना सुरू असून मुस्लिम धर्माचे लोक या महिन्यात रोजा ठेवतात. सध्या, स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतीय संघाचा भाग आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळत आहे. आता रमजान महिन्यात शमीबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. शमी एका फोटोमुळे ट्रोल होत आहे ज्यामध्ये तो एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे. यानंतर शमी कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आला आहे.

शमीने रमजान महिन्यात उपवास न ठेवल्याने त्याने मोठा गुन्हा केल्याचे बोलले जात आहे. मोहम्मद शमी अल्लाचा मोठे गुन्हेगार आहे, अल्लाला त्याला उत्तर द्यावी लागतील, अशा भाषेत त्याच्यावर कट्टरवाद्यांकडून टीका केली जात आहे. आता शमीच्या बचावात एमसीएचे अध्यक्ष आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे वक्तव्य समोर आले आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, “मोहम्मद शमी भारतीय देशाचे प्रतिनिधीत्त्व करत आहे. त्याच्या मनात असं आल असेल की मी जर रोजा ठेवला किंवा उपवास केला तर याचा माझ्या कामगिरीवर परिणाम होईल आणि त्यामुळे काही चुकीचं घडून भारतीय संघाने सामना गमावला तर तो कधी सुखाने झोपू शकणार नाही, जगू शकणार नाही. तो एक भारतीय आहे. त्याने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे भारताचं प्रतिनिधीत्त्व करताना हा विषय नाही आणला पाहिजे.”

पुढे रोहित पवार म्हणाले, “खेळामध्ये धर्म नाही आणला पाहिजे. आता जर तुम्ही कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला जाऊन विचारलंत तर ते हेच म्हणतील की आम्हाला शमीचा अभिमान आहे.”

मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत ८ विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ५ विकेट घेतल्या होत्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ विकेट घेतले. मोहम्मद शमी एकदम अचून लाईन लेंग्थसह गोलंदाजी करतो आणि याशिवाय तो रिव्हर्स स्विंग टाकण्यातही माहिर आहे.

Story img Loader