Mohammed Shami had a chronic problem with his left heel : अलीकडेच विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमी अव्वल स्थानी राहिला. मोहम्मद शमीने सात सामन्यात २४ विकेट घेतल्या होता. आता सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. मात्र, मोहम्मद शमी भारतीय संघाचा भाग नाही. मोहम्मद शमी दुखापतीमुळे खेळत नाहीये. त्याचवेळी, आता मोहम्मद शमीच्या फिटनेसशी संबंधित मोठी माहिती समोर येत आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद शमी वर्ल्ड कप सामन्यांदरम्यान वेदनांशी झुंजत होता, परंतु तो सामना खेळता यावा म्हणून इंजेक्शन्स घेत होता.
मोहम्मद शमीसह बंगालकडून खेळलेल्या एका क्रिकेटपटूने पीटीआयला सांगितले की, डाव्या टाचेची समस्या वेगवान गोलंदाजासाठी जुनी आहे. खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. तो म्हणाला की, मोहम्मद शमीला वर्ल्ड कप सामन्यांदरम्यान वेदना होत होत्या, त्यामुळे सतत इंजेक्शन घेत होता. अशा प्रकारे मोहम्मद शमीने विश्वचषकात खेळणे सुरूच ठेवले.
विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये सतत इंजेक्शन घेत राहिला –
मोहम्मद शमीसह बंगालकडून खेळलेल्या एका त्याच्या सहकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, ‘मोहम्मद शमीच्या डाव्या पायाच्या टाचेची जुनी समस्या आहे. बर्याच लोकांना माहित नाही की विश्वचषकादरम्यान त्याने वारंवार इंजेक्शन्स घेतली आणि संपूर्ण स्पर्धेत त्याला वेदना सहन कराव्या लागल्या. पण तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, तुमचे जसजसे वय वाढत जाते, तसतसे प्रत्येक दुखणे किंवा मोठ्या दुखापतीतून बरे होण्यासाठी वेळ लागतो.’
विश्वचषकानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली आहे. मात्र मोहम्मद शमी टीम इंडियाकडून खेळत नाहीये. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा सहज पराभव केला. मोहम्मद शमीच्या जागी प्रसिध कृष्णाला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. पण प्रसिद्ध कृष्ण अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. प्रसिध कृष्णाने सेंच्युरियन कसोटीत २० षटके टाकली. ज्यामध्ये ४.७च्या इकॉनॉमीसह ९३ धावा खर्च केल्या होत्या, परंतु फक्त एक विकेट घेता आली.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.