भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. या सामन्यात टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलच्या जोरावर सर्वबाद ४०० धावा केल्या. ज्यामुळे भारताकडे २२३ धावांचा आघाडी आहे. या दरम्यान मोहम्मद शमीने लगावेलल्या षटकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रवींद्र जडेजाची विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला वाटत होते की आता भारताचा डाव संपला. पण मोहम्मद शमीने फलंदाजीला येताच गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. शमीने ४७ चेंडूत तीन षटकार मारत ३७ धावा केल्या. त्यापैकी सर्वात नेत्रदीपक षटकार त्याने स्टार गोलंदाज टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर लगावला.
खरं तर, मोहम्मद शमीने १३१ व्या षटकातील तिसरा चेंडूवर हा षटतकार लगावला. मर्फीने त्याला गुड लेन्थ चेंडू टाकला होता. ज्यावर शमीने गुडघे टेकून शानदार गगनचुंबी षटकार लगावला. जो सर्वजण पाहत राहिले. इतकेच नाही, तर गोलंदाज टॉड मर्फीही अवाक झाला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईपर्यंत पाहत राहिला.
त्यानंतर शमीने आणखी एक षटकार मारून कांगारूंना आश्चर्यचकित केले. मात्र, यानंतर मर्फीच्याच चेंडूवर तो बाद झाला. शमीची ही खेळी कायम लक्षात राहील. कारण त्याने फलंदाजांना दाखवून दिले की मर्फीची गोलंदाजी कशी फोडून काढायची. याआधी टॉड मर्फीने भारतीय संघाच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.
सामन्याबद्दल बोलायचे, तर भारताने पहिल्या डावात ४०० धावा केल्या. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने अक्षर पटेलला त्रिफळाचीत करून भारताचा डाव संपवला. अक्षर पटेलने १७४ चेंडूत ८४ धावा केल्या. त्याच्या खेळीत १० चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अक्षरचे शतक नक्कीच हुकले, पण त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने २२३ धावांची आघाडी घेतली.