Mohammed Shami Comeback Date Fixed: भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर शमी पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. शमीने शेवटचा सामना २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळला होता. तेव्हापासून तो विश्रांतीवर आहे. दरम्यान, मोहम्मद शमी आणि टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मोहम्मद शमी भारतीय संघात कधी पुनरागमन करणार याची माहिती मिळाली आहे.
मोहम्मद शमी रणजी ट्रॉफीमध्ये बंगालसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. यानंतर तो न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळू शकतो. जे त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन असेल. फिटनेस तपासण्यासाठी शमी आधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. यानंतर भारत येत्या काळात बऱ्याच कसोटी मालिका खेळणार आहे. ज्यासाठी शमी संघात असल्यास संघाला अधिक मदत मिळेल.
पीटीआयच्या अहवालानुसार, मोहम्मद शमी बंगालच्या सलामीच्या रणजी सामन्यात ११ ऑक्टोबर रोजी यूपी विरुद्ध आणि पुढचा सामना १८ ऑक्टोबर रोजी कोलकाता येथे बिहार विरुद्ध खेळताना दिसू शकतो. या दोन्ही सामन्यांमध्ये तो दिसणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, दोन्ही सामन्यांमध्ये केवळ दोन दिवसांचे अंतर असल्याने तो दोन्ही सामने खेळण्याची शक्यता नाही. भारताची न्यूझीलंड कसोटी मालिका १९ ऑक्टोबरपासून बेंगळुरूमध्ये सुरू होईल, त्यानंतर पुणे (२४ ऑक्टोबर) आणि मुंबईत (१ नोव्हेंबर) कसोटी सामने होतील. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी शमी यापैकी एक सामना खेळेल अशी अपेक्षा आहे. शस्त्रक्रियेपूर्वी शमी जबरदस्त फॉर्ममध्ये होता.
हेही वाचा – IND vs SL: सुपर ओव्हरचं विसरले अंपायर; भारत-श्रीलंका सामना राहिला टाय
फेब्रुवारी २०२४ मध्ये युनायटेड किंगडममध्ये घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर शमीने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही, ज्यामुळे त्याला सहा महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले आहे. आता शस्त्रक्रियेनंतर ११ महिन्यांनी तो पुनरागमन करत आहे. शमीने इन्स्टाग्रामवर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये छोट्या रनअपसह गोलंदाजी सुरू करतानाचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर, तो दुलीप ट्रॉफीसाठी उपलब्ध होऊ शकतो, असे वृत्त होते. परंतु असं घडलं नाही.
दुलीप ट्रॉफीपर्यंत शमी तंदुरुस्त होण्याची शक्यता नव्हती आणि निवडकर्त्यांनी त्याला आवश्यकतेपेक्षा लवकर संघात सामील करून जोखीम पत्करायची नव्हती. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे भारताचे अव्वल तीन वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांसाठी तंदुरुस्त होणे हे बीसीसीआयचे प्राधान्य आहे. शमीने आतापर्यंत ६४ कसोटी सामन्यांमध्ये सहा वेळा ५ विकेट्स आणि १२ वेळा चार विकेट्स घेत २२९ विकेट घेतले आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd