इंदूर : नुकताच करोनामुक्त झालेल्या मोहम्मद शमीने आपली तंदुरुस्ती सिद्ध केल्यास त्याची जायबंदी जसप्रीत बुमराच्या जागी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात निवड होऊ शकेल, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने संकेत दिले आहेत.
पाठीच्या दुखापतीमुळे बुमराला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. या स्पर्धेसाठी शमी आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव शमीच्या पथ्यावर पडू शकेल. ‘‘बुमराची जागा घेणाऱ्या गोलंदाजासाठी आम्ही विविध पर्यायांचा विचार करत आहोत. आम्हाला १५ ऑक्टोबपर्यंतचा वेळ आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये शमीचा समावेश आहे. त्याला नुकत्याच झालेल्या दोन मालिकांमध्ये खेळता आले नाही. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) आहे. करोनामुक्त झाल्यानंतर १४-१५ दिवसांत त्याची प्रकृती आणि तंदुरुस्तीबाबतचा वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर आम्हाला पुढील निर्णय घेता येईल,’’ असे द्रविड म्हणाला.