Mohammad Shami On Mitchell Marsh: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी भारताचा सहा विकेट्सने पराभव करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उत्सवादरम्यान, अष्टपैलू मिचेल मार्श ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेला एक फोटो व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. मिशेलच्या या कृतीवरून भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांनी प्रचंड टीका केली होती, अलिगढ मध्ये तर एका कार्यकर्त्याने मोदींना पत्र धाडून मार्शला भारतात खेळण्याची परवानगी दिली जाऊ नये अशीही विनंती केली होती. आता मार्शच्या कृतीवर भारताचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने प्रतिक्रिया दिली आहे.
मोहम्मद शमीने गुरुवारी पत्रकारांसमोर या विषयावर भाष्य केले. “मला खूप वाईट वाटले. ज्या चषकासाठी जगातील सर्व संघ लढतात ज्या ट्रॉफीला तुम्ही डोक्यावर घ्यायला हवे त्याच ट्रॉफीवर पाय ठेवून बसणं हे बघणं मला आवडलेलं नाही.” दुसरीकडे मिशेल मार्शच्या या फोटोमुळे भारतात चक्क एक एफआयआर नोंदवण्यात आल्याचे समजतेय.
हे ही वाचा<< विश्वचषकावर पाय ठेवणाऱ्या मिशेल मार्श विरुद्ध एफआयआर! मोदींनाही धाडलं पत्र, ऑस्ट्रेलियाच्या स्टारला भारतात बंदी?
दरम्यान, मोहम्मद शमीने विश्वचषकात गमावलेल्या चार सामन्यांविषयी सुद्धा भाष्य केले.शमी म्हणाला की, “जेव्हा तुम्ही संघात असूनही खेळायला मैदानात नसता तेव्हा मानसिकदृष्ट्या सबळ राहणे खूप गरजेचे आहे. यावेळी दडपण येते पण तुम्हाला संधी मिळणार असते. आणि जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता तेव्हा ते समाधानही तुमच्या वाट्याला येणार असते.” विश्वचषकात मोहम्मद शमी हा भारताचा हुकुमी एक्का सिद्ध झाला होता त्याने मुंबईतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध ५७ धावांत ७ विकेट्सच्या विक्रमी स्पेलसह सात सामन्यांत २४ विकेट घेतल्या.