India vs Pakistan Match Updates, Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान पारंपरिक लढतीत मोहम्मद शमीच्या नावावर एक नकोसा विक्रम लागू झाला. दुबई येथे सुरू असलेल्या लढतीत मोहम्मद शमीने टाकलेल्या पहिल्या षटकात ११ चेंडू टाकले. ३४वर्षीय शमी या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्षभरानंतर पुनरागमन करत आहे. त्याच्या गुडघ्याला अजूनही सूज आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत अनुभवी शमीकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र पाकिस्तानविरुद्ध शमीच्या षटकाने कर्णधार रोहित शर्माची चिंतेत भर घातली.

शमीने टाकलेलं षटक चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातलं दुसरं सगळ्यात मोठं षटक ठरलं. २०१७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध जसप्रीत बुमराहने टाकलेल्या षटकात ९ चेंडू होते. शमीने या षटकात चार वाईड टाकले. दुबईतल्या प्रचंड उष्णतेचा परिणाम त्याच्या शरीरावर जाणवला. षटक संपल्यानंतर शूज बदलण्यासाठी शमी ड्रेसिंगरुममध्ये परतला. परत आल्यानंतर शमीला दुखापत त्रास देत असल्याचं दिसत होतं. फिजिओने तातडीने मैदानात धाव घेत उपचार केले.

शमीने बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या लढतीत पाच विकेट्स घेत दमदार सुरुवात केली. मी पुन्हा क्रिकेट खेळू शकेन असं वाटलं नव्हतं असं शमी सामन्यानंतर बोलताना म्हणाला होता. २०२३ वनडे वर्ल्डकपमध्ये शमीने सर्वाधिक विकेट्स पटकावल्या. मात्र या स्पर्धेत तो दुखापतग्रस्त असतानाच खेळत होता. शमी यानंतर शस्त्रक्रियेला सामोरा गेला. वर्षभर त्याला कोणत्याही स्वरुपाचं क्रिकेट खेळता आलं नाही.

Story img Loader