Mohammed Shami Viral Video: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने इतिहास घडवला आणि तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावणारा पहिला संघ बनला. हा विजय टीम इंडियासाठी संस्मरणीय ठरला ज्यामध्ये टीम इंडियाने किवींचा ४ विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत अपराजित राहून भारताने चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. पण या सामन्यातील मोहम्मद शमीचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
५० षटकांच्या फॉरमॅटमधील आयसीसीचे विजेतेपद जिंकण्यासाठी भारताला तब्बल १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडिया निश्चितपणे अंतिम फेरीत पोहोचली असली तरी विजेतेपदापासून दूर राहिली होती. रोहित शर्माच्या टीमने दुबईत हे अपूर्ण कार्य पूर्ण करत आणि फायनल जिंकून भारतीय खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय साजरा केला.
भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ट्रॉफीबरोबर फोटो काढण्यापूर्वी स्टेजवरून खाली उतरला. चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी शॅम्पेनच्या बॉटल उडवत आनंद साजरा केला. त्यामुळेच शमी स्टेजवरून खाली उतरला. इस्लाम धर्मात दारू निषिद्ध मानली जाते आणि धार्मिक कारणांमुळे मोहम्मद शमी शॅम्पेन उडवताना स्टेजवरून उतरला.
मोहम्मद शमीने रमजानच्या महिन्यात रोजा न ठेवल्याने त्याच्यावर इस्लाम समाजातील काही कट्टरवाद्यांकडून टीकेला सामोरे जावे लागले. मोहम्मद शमीने रोजा न ठेवून गुन्हा केल्याचे म्हटले गेले. रमजानचा महिना सुरू झाला तेव्हा भारतीय संघ दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळत होता. यामधील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात शमी त्याच्या षटकानंतर सीमारेषेजवळ एनर्जी ड्रिंक पितानाचा फोटो व्हायरल झाला होता, त्यानंतर या चर्चेला उधाण आलं होतं.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीने भारताच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व केले आणि ५ सामन्यांत ९ विकेट्स घेऊन वरुण चक्रवर्तीसह भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत सामील झाला. शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्याच बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात ५ विकेट्स घेत आपल्या पुनरागमनाचा डंका वाजवला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एक एक करून भारताचे सर्व खेळाडू मायदेशात परतत आहेत. एअरपोर्टवर चाहते प्रचंड गर्दीसह त्यांचं स्वागत करताना दिसले.