पत्नी हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेल्या गोलंदाज मोहम्मद शमीच्या आयपीएलमधील सहभागासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. परंतु बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधविरोधी पथकाने शमीची कसुन चौकशी केल्यानंतर त्याला संबंधीत आरोपावर क्लिन चीट देत त्याचा आयपीएल सहभाग निश्चित केला आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या ११व्या सत्रात तो दिल्ली संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शमीच्या पत्नीने त्याचे अनेक स्त्रियांशी अनैतीक संबंध आहेत. पाकिस्तानमध्ये त्याची प्रियसी आहे. असे अनेक आरोप त्याच्यावर केले होते. परिणामी बीसीसीआयने त्याच्या आर्थिक करारातही घट केली होती. परंतु त्यानंतर पत्नीने केलेल्या मॅच फिक्सींग सारख्या आरोपामुळे त्याची क्रिकेट कारकिर्दच संकटात आली होती. पण बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख नीरज कुमार व त्यांच्या टीमने केलेल्या कसुन चौकशीनंतर शमीचा आयपील सहभाग निश्चित झाला आहे.

शामी- हसीनच्या वादामागील मूळ प्रकरण काय?

शमीच्या निकटवर्तीयांच्या मते, दोघांमधील भांडणाचे मूळ कारण उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील कोट्यावधी रुपयांचे फार्महाउस आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीने अमरोहा येथील अली नगर गावात जे फार्म हाऊस विकत घेतले होते तेथे स्पोर्ट्स अकादमी सुरू करण्याची त्याची इच्छा आहे. हसीनला मात्र शमीचा हा निर्णय फारसा मान्य नव्हता. हसीनला अमरोहाएवजी पश्चिम बंगालमध्ये मालमत्ता विकत घ्यायची होती.

शमीने ६० एकरची जमीन विकत घेतली. या जमिनीचा बाजार भाव साधारणपणे १२ ते १५ कोटी रुपयांपर्यंत होतो. शमीने त्याच्या फार्महाऊसचे नाव पत्नीच्या नावेच ठेवले आहे. पण कायदेशीररित्या या जागेवर हसीनचा कोणताही अधिकार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरोहमध्ये मालमत्ता विकत घेतल्यानंतरच शमी- हसीनच्या सुखी संसारात वादाची ठिणगी पडायला सुरूवात झाली. शमीची जन्म भूमी अमरोह आहे. पण तो सध्या पश्चिम बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. शिवाय हसीनही कोलकाताची राहणारी आहे.

याआधी हसीनने शमीवर अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. या आरोपांसोबत हसीनने हेही सांगितले होते की शमी आणि त्याच्या परिवाराने तिला शारीरिक आणि मानसिक त्रासही दिला आहे. हसीनने शमीविरोधात कोलकाता पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. हसीनने शमीचे एका पाकिस्तानी महिलेसोबत संबंध असल्याचे म्हटले. त्याने दुबईत राहून मॅच फिक्सिंग केल्याचेही म्हटले. हसीनाने केलेल्या सर्व आरोपांचे शमीने खंडन केले आहे. देशाला धोका देण्यापेक्षा मी मरण पत्करेन असे स्पष्टीकरण शमीने दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed shami to play for dd in ipl 2018 despite wife hasin jahans allegations