भारत आणि बांगलादेश संघात रविवारी (४ डिसेंबर) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना आज ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवरील खेळला जात आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. वनडे मालिकेपूर्वी मोहम्मद शमी दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. अशात मोहम्मद शमीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
मोहम्मद शमीने खांद्यावर उपचार सुरु असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने एक भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. शमीची दुखापत हा भारतासाठी मोठा धक्का आहे. कारण आता भारतीय संघात एकही वरिष्ठ वेगवान गोलंदाज नाही. शमीच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
मोहम्मद शमीने आपल्या ट्विटमध्ये लिहले, ”दुखापत, सर्वसाधारणपणे, प्रत्येक क्षणाचे कौतुक करण्यास शिकवते. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला दुखापतींचा सामना करावा लागला आहे. हे सभ्य आहे. हे तुम्हाला दृष्टीकोन देते. मला किती वेळा दुखापत झाली याने काही फरक पडत नाही, मी त्यातून शिकतो आणि पुन्हा मजबूत होतो.”
शमीने त्याच्यावर उपचार सुरू असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो उजव्या खांद्यावर इंजेक्शन घेताना दिसत आहे. शमी त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत दुखापतीमुळे संघात आणि बाहेर होत राहिला आहे. यावेळीही तो बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी जखमी झाला आहे. ३२ वर्षीय शमी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. यानंतर त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली होती. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत बांगलादेशविरुद्ध शमी भारतीय वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करणार होता, परंतु सराव सत्रा दरम्यान त्याला दुखापत झाली.