Border Gavaskar Trophy 2024 Mohammed Shami: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तब्बल वर्षभरानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. मोहम्मद शमीला भारतात झालेल्या वनडे विश्वचषक २०२३ मध्ये घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर शमीच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि या दुखापतीतून पुनरागमन करण्यासाठी त्याला फार वेळ लागला. पण आता शमीने बंगालकडून रणजी ट्रॉफी सामन्यात ४ विकेट्स घेत आणि शानदार फलंदाजी करत पुनरागमन केले. यानंतर आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी मोहम्मद शमी भारतीय संघात सामील होणार असल्याची बातमी समोर येत आहे.
मोहम्मद शमीचे बालपणीचे प्रशिक्षक मोहम्मद बदरुद्दीन यांनी खुलासा केला आहे की, वेगवान गोलंदाज २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी सज्ज आहे. शमी नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये क्रिकेटच्या मैदानात परतला आणि या मोसमात त्याने पहिला सामना मध्य प्रदेशविरुद्ध खेळला.
मोहम्मद शमीने भारतासाठी शेवटचा सामना २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला होता आणि त्यानंतर तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता. शमी खूप मेहनतीनंतर मैदानात परतला आणि मध्य प्रदेशविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने १९ षटकांत ५४ धावा देत ४ विकेट घेतले. त्याने दुसऱ्या डावातही आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करत ३६ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारांसह ३७ धावा केल्या.
शमीच्या या कामगिरीनंतर तो ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र आता त्याच्या प्रशिक्षकांनी ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर तो भारतीय संघात सामील होणार असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. शमीचे बालपणीचे प्रशिक्षक बदरूद्दीन यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर तो टीम इंडियामध्ये सामील होणार आहे. शमीने आता पुनरागमन केले असून त्याने आपला फिटनेसही सिद्ध केला आहे. त्याने विकेट्सही घेतल्या आहेत. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.”
मोहम्मद शमी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतासाठी खेळला होता. जिथे त्याने १०.७० च्या सरासरीने आणि ५.२६ च्या इकॉनॉमी रेटने २४ विकेट्स घेऊन स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली. २०२३ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात त्याने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला. शमीने ऑस्ट्रेलियात आठ सामन्यांत ३२.१६ च्या सरासरीने आणि ३.५५ च्या इकॉनॉमीने ३१ विकेट घेतले आहेत.