गुरुग्राम : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या तंदुरुस्तीबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बहुप्रतीक्षित बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेसाठी तो उपलब्ध असणार की नाही, असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. शमीने अद्याप आशा सोडलेली नसून मी पूर्णपणे वेदनामुक्त असल्याचे तो सोमवारी म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका अद्याप दूर आहे, त्याआधी मी बंगालकडून रणजी सामने खेळण्यास इच्छुक असल्याचेही त्याने नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी क्रिकेट सामना रविवारी समाप्त झाल्यानंतर बंगळूरु येथेच शमीने पूर्ण जोमाने गोलंदाजी केली. यावेळी त्याला कोणतीही अडचण जाणवली नाही. काही दिवसांपूर्वीच भारताचा कर्णधार रोहित शर्माने शमीबाबत कोणताही धोका पत्करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. गेल्या वर्षी शमीच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली होती आणि यावर्षी फेब्रुवारीत त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यातून सावरून सरावास सुरुवात केल्यानंतर शमीसमोर पुन्हा अडथळा निर्माण झाला होता. त्याच्या गुडघ्याला सूज येत असल्याचे रोहितने सांगितले होते. मात्र, शमीने रविवारी नेट्समध्ये पूर्ण ताकदीने गोलंदाजी केल्याने भारताच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत.

हेही वाचा >>> बजरंग, विनेशची चळवळ स्वार्थी वाटली : साक्षी मलिक

‘‘मी काल (रविवारी) ज्या प्रकारे गोलंदाजी केली, त्याने खूप खूश होतो. मी याआधी कमी धावून (रनअप) गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो, कारण मला पायावर जास्त ताण आणायचा नव्हता. मात्र, रविवारी मी पूर्ण ताकदीने गोलंदाजी करण्याचे ठरवले. मी निकालाने खूश होतो. मी पूर्णपणे वेदनामुक्त आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी माझ्या उपलब्धतेबाबत सर्वांना प्रश्न पडला आहे, परंतु ती मालिका अजून बरीच दूर आहे,’’ असे शमीने सोमवारी सांगितले.

पूर्णपणे तंदुरुस्त असल्याशिवाय आणि गोलंदाजीचा पुरेसा सराव केलेला असल्याशिवाय भारतीय संघ शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार नसल्याचे रोहित म्हणाला होता. त्यामुळे शमीने रणजी करंडकात काही सामने खेळण्याची तयारी दर्शवली आहे.

‘‘मी केवळ पूर्ण तंदुरुस्ती प्राप्त करण्याचाच विचार करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी मी मैदानावर वेळ घालवणे गरजेचे आहे. त्यामुळे रणजी करंडकात काही सामने खेळण्यासाठी मी इच्छुक आहे,’’ असे शमी म्हणाला.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर शमीने स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही.

बंगालचा पुढील सामना शनिवारपासून

● रणजी करंडकातील तिसऱ्या फेरीच्या सामन्यांना शनिवारपासून (२६ ऑक्टोबर) सुरुवात होणार असून बंगालची गाठ केरळशी पडेल. त्यानंतर ६ नोव्हेंबरपासून बंगाल आणि कर्नाटक यांच्यात सामना होईल.

● या सामन्यात खेळण्याबाबत विचारले असता, ‘‘मी नक्की कधी खेळणार हे आताच सांगता येणार नाही. मी २० ते ३० षटके टाकू शकतो असे वाटेल आणि डॉक्टरही मला परवानगी देतील, तेव्हाच मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करेन. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी मला जास्तीतजास्त वेळ मैदानावर घालवायचा आहे. मात्र, तंदुरुस्तीची खात्री पटल्याशिवाय मी सामना खेळणार नाही हे नक्की,’’ असे शमीने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed shami willing to play ranji matches zws