भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या आठवणी कोणताही भारतीय स्मरणात ठेवू इच्छिणार नाही. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ६ गडी राखून पराभव केला. त्यामुळे तिसऱ्यांदा एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक उंचावण्याचं तमाम भारतीयांचं स्वप्न भंगलं. हा अंतिम सामना भारतीयांना स्मरणात नको असला, तरी पराभवानंतर भर मैदानातच रडू कोसळलेला मोहम्मद सिराज कुणीही विसरू शकणार नाही. जसप्रीत बुमरा त्याची समजूत काढत असतानाही त्याला रडू आवरत नव्हतं. त्या सामन्यानंतर चार दिवसांनी मोहम्मद सिराजनं आपल्या भावना इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडलं अंतिम सामन्यानंतर?

ग्लेन मॅक्सवेलनं विजयी फटका मारल्यानंतर एकीकडे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जल्लोष करत असताना दुसरीकडे भारतीय खेळाडूंना भावना अनावर होत होत्या. खुद्द कर्णधार रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये जाताना भावनिक झाल्याचं दिसून आलं. मोहम्मद सिराजला तर भर मैदानातच रडू कोसळलं. या प्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. भावनिक झालेल्या सिराजला जसप्रीत बुमरानं शांत करण्याचा प्रयत्नही केला.

मोहम्मद सिराजची इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, मोहम्मद सिराजनं या सर्व अनुभवाबाबत सविस्तर इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. “यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा शेवट आम्हाला हवा तसा झाला नाही. पण भारताचं प्रतिनिधित्व करणं हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आणि अभिमानाची बाब आहे. मला फक्त आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायचं होतं”, असं सिराजनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“पराभवामुळे मला खूप वाईट वाटलं. शब्दांमधून त्या वेदना मांडणं निव्वळ अशक्य आहे. हा पराभव पचवणं फार कठीण आहे. कदाचित यावेळी ईश्वराचीच तशी इच्छा नसावी. पण देशासाठी दररोज अधिकाधिक कठोर मेहनत घेणं हेच आमचं लक्ष्य आहे”, असंही त्यानं नमूद केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ विजय साजरा करताना ‘हा’ क्षण पाहून डोळे पाणवतील! मोहम्मद सिराजने शेवटचा बॉल टाकला आणि..

सपोर्ट स्टाफचे मानले आभार

दरम्यान, आपल्या पोस्टमध्ये मोहम्मद सिराजनं संघाच्या सपोर्ट स्टाफचे आभार मानले आहेत. “आमच्या या प्रवासाचं मोठं श्रेय आमच्या सपोर्ट स्टाफला जातं. पडद्यामागे राहून त्यांनी आम्हाला प्रत्येक सामन्यासाठी तयार करण्यात आणि आम्हाला आवश्यक असलेली काळजी घेण्यात मोठी भूमिका बजावली. संघासाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे”, असं तो म्हणाला.

“शेवटी मी सर्व क्रिकेट चाहत्यांना धन्यवाद देईन. स्टेडियममध्ये त्या निळ्या रंगाचा समुद्र पाहणे ही भावना अत्युच्च आहे. खरंच खूप विलक्षण! तुम्हा क्रिकेट चाहत्यांनी दिलेली ऊर्जा संपूर्ण विश्वचषकात आमच्या पाठिशी होती. जय हिंद”, अशा शब्दांत सिराजनं आपल्या पोस्टचा शेवट केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed siraj instagram post on world cup 2023 final ind vs aus match pmw
Show comments