अहमदाबाद : एका सामन्यातील खराब कामगिरीमुळे मी वाईट गोलंदाज ठरत नाही. तुम्हाला चढ-उतार हे पाहावेच लागतात, असे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज म्हणाला. एकदिवसीय विश्वचषकातील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सिराजने नऊ षटकांतच ७६ धावा खर्ची केल्या होत्या, त्यामुळे त्याच्यावर काही प्रमाणात टीका झाली. मात्र, पाकिस्तानविरुद्ध खेळ उंचावताना सिराजने ५० धावांत २ गडी बाद केले आणि यात बाबर आझमचाही समावेश होता. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘माझा प्रयत्न नेहमी चांगली गोलंदाजी करण्याचाच असतो आणि पूर्ण आत्मविश्वासानिशी गोलंदाजी करतो. एका सामन्यात खराब कामगिरी झाली म्हणून मी वाईट गोलंदाज ठरत नाही. माझी पार्श्वभूमी पाहता मी कधी विश्वचषक स्पर्धा खेळेन असे वाटले नव्हते. विश्वचषकात खेळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. भारत व पाकिस्तान सामने हे नेहमीच आव्हानात्मक असतात. मी चांगली कामगिरी करू शकलो याचा आनंद आहे,’’ असे सिराजने सांगितले.

हेही वाचा >>> ENG vs AFG, WC 2023: इंग्लंडवरील थरारक विजयानंतर रवी शास्त्रींनी अफगाणिस्तानचे केले कौतुक; म्हणाले, “विश्वचषक इतिहासात…”

अहमदाबादच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना फारशी मदत नव्हती. मात्र सिराजने वेगळे प्रयोग करत गडी बाद केले. याबाबत तो म्हणाला, ‘‘मी तिसऱ्या षटकापासून विविध गोष्टी करून पाहण्यास सुरुवात केली, कारण त्या बाजूने ‘रिव्हर्स स्विंग’ मिळण्याची शक्यता होती. सुरुवातीला माझ्या चेंडूंचा सामना करताना पाकिस्तानच्या फलंदाजांना फारशा अडचणी येत नव्हत्या. त्यानंतर मी क्रॉस सीमने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चेंडूला चांगली उसळी मिळाली आणि याचा फायदा मला झाला.’’

‘हॉटस्टार’वर विक्रमी प्रेक्षकवर्ग एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्यांचे मोफत प्रसारण करणाऱ्या डिस्नी-हॉटस्टार अ‍ॅपवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी विक्रमी प्रेक्षकवर्गाची नोंद झाली. डिस्नी-हॉटस्टारच्या माध्यमातून तब्बल ३.५ कोटी दर्शकांनी भारत-पाकिस्तान सामना पाहिल्याची नोंद झाली आहे. यापूर्वी हा विक्रम ३.२ कोटी दर्शकसंख्येचा होता. ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामातील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात जायंट्स या अंतिम सामन्याला हा प्रेक्षकवर्ग मिळाला होता. भारत-पाकिस्तान हा आशिया चषकातील सामनाही या प्लॅटफॉर्मवरून २.८ कोटी प्रेक्षकांनी पाहिला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed siraj reaction after impressive bowling vs pakistan in world cup 2023 zws