यू मुंबाच्या खेळाडूंच्या अन्य संघांकडून ‘पकड’; अव्वल दहा खेळाडूंकडून २६ लाखांचा आकडा पार
निझामपूर गावात राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मोहित चिल्लरने प्रो-कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामासाठी झालेल्या लिलावामध्ये सर्वाचे लक्ष वेधून घेतले. बंगळुरू बुल्सने सर्वाधिक ५३ लाखांचे बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले. यंदाच्या लिलावात प्रो-कबड्डीतील सर्वात यशस्वी संघ म्हणून बिरुद मिरवणाऱ्या यू मुंबाच्या महत्त्वाच्या खेळाडूंची अन्य संघांनी प्रामुख्याने पकड केली. महाराष्ट्राकडून सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंमध्ये नितीन मदनेने (२४.५ लाख) बाजी मारली. त्याला बंगाल वॉरियर्सने पुन्हा आपल्या चमूत दाखल करून घेतले.
सध्या चालू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पध्रेचा आलेख एकीकडे घसरत असताना शुक्रवारी मुंबईत झालेल्या शानदार लिलाव कार्यक्रमात अव्वल दहा खेळाडूंनी २६ लाखांचा आकडा पार केला. कबड्डी हा प्रामुख्याने चढाईपटूंचा खेळ मानला जायचा, मात्र त्याला छेद देत पकडपटूंनी ‘लक्ष’वेधी भरारी घेतल्याचे लिलावात दिसून आले.
प्रो-कबड्डीच्या या लिलावात प्रत्येक संघाला दोन खेळाडू कायम ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र उर्वरित खेळाडूंची निवड करताना बऱ्याच संघांनी आपली ओळख जपण्याच्या हेतूने काही खेळाडूंना कायम ठेवले, तर काही संघांनी पूर्णत: कायापालट केला. या लिलावाचा सर्वात जास्त फटका यू मुंबाला बसला. यू मुंबाच्या यशस्वी शिलेदारांपैकी मोहित चिल्लर आणि सुरेंदर नाडा (३० लाख) या दोन कोपरारक्षकांना बंगळुरूने आपल्या चमूत आणण्यात यश मिळवले. मध्यरक्षक विशाल मानेला (२४ लाख) बंगाल वॉरियर्सने, तर कोपरारक्षक फझल अत्राचालीला पाटणा पायरेट्सने ३८ लाखांना खरेदी केले. तसेच शब्बीर बापूला जयपूरने ३२ लाख २० हजार रुपयांना खरेदी केले. त्यामुळे यू मुंबाच्या अभेद्य बचावफळीला भेदण्यात अन्य संघ यशस्वी झाले आहेत. सुदैवाने मध्यरक्षक जीवा कुमार (४० लाख) आणि राकेश कुमार या अनुभवी खेळाडूंना यूमुंबाला आपल्याकडे राखता आले आहे. प्रो-कबड्डीच्या पहिल्यावहिल्या लिलावात सर्वाधिक १२ लाख ८० हजारांची बोली लागलेला भारताचा माजी संघनायक राकेशसाठी यू मुंबाने २६ लाख रुपये मोजले.
पाटणा पायरेट्सच्या संदीप नरवालसाठी दुसऱ्या क्रमांकाची ४५ लाख ५० हजार इतकी बोली लावत तेलुगू टायटन्सने त्याला आपल्या संघात सामील केले. याच संघाने पुणेरी पलटणच्या जसमेर सिंग गुलियाला ३५ लाख ५० हजार रुपयांना खरेदी केले. जयपूर पिंक पँथर्सचा अष्टपैलू खेळाडू कुलदीप सिंगला पाटणा पायरेट्सने ३० लाख ४० हजार असा भाव दिला. मागील हंगामात पुण्याकडून खेळताना लक्ष वेधणारा कोल्हापूरचा युवा खेळाडू तुषार पाटील जयपूर संघात दिसणार आहे. तर प्रशांत चव्हाणला दबंग दिल्लीने आपल्या संघात सामील केले आहे.
इराणी खेळाडूंना मागणी
परदेशी खेळाडूंच्या यादीत सर्वाधिक बोलीसह फझल अत्राचालीने (३८ लाख) बाजी मारली. याशिवाय त्याचे इराणी साथीदार मेराज शेखला दिल्लीने १९ लाखांना तर हादी ओश्तोरॅकला पाटणाने ८ लाखांना खरेदी केले. दक्षिण कोरियाच्या यांग कुन ली याला संघात कायम ठेवण्यासाठी बंगालने २२ लाख रुपये खर्च केले.
महिलांचा प्रदर्शनीय सामना
प्रो-कबड्डीचे सामने होत असलेल्या आठ शहरांमध्ये प्रत्येकी एक महिलांचा प्रदर्शनीय सामना होणार आहे. याकरिता भारतीय हौशी कबड्डी महासंघ तीन संघ तयार करणार आहे. महिला प्रो-कबड्डीच्या दिशेने ते पहिले पाऊल असेल, अशी प्रतिक्रिया सूत्रांनी दिली.