मोहम्मद शमी हे एक नाव नाहीये. ते एक प्रारुप आहे, वैयक्तिक आयुष्यात काय होतंय याचा तुमच्या कामावर जराही परिणाम होऊ न देण्याचं.
गुणवत्ता, कर्तृत्व अनेकांकडे असतं. पण शमीसमोर नियतीने जे अडथळे रचले ते फारच कमी लोकांच्या वाट्याला येतात. असं म्हणतात जे समर्थपणे सामना करु शकतात त्यांच्यासमोरची आव्हानंही डोंगराएवढी असतात. शमीचा प्रवास एखाद्या चित्रपटाची किंव वेबसीरिजची कहाणी वाटावा इतका अतर्क्य. उन्मळून जावं असं आयुष्यात घडत असताना हा माणूस पुन्हापुन्हा उभा राहतो आणि आपल्या कामाने जगाला दखल घ्यायला भाग पाडतो. शमीचा रनअप जितका सहज लयबद्ध आहे तितकंच त्याचं आयुष्य खाचखळग्यांनी भरलेलं. वैयक्तिक आयुष्यात कटू अनुभवांनी पोळलेला शमी मैदानात अशी कमाल करतो की चाहत्यांच्या आयुष्यात आनंदाचं कारंजं उसळतं.
सहसपूर हे उत्तर प्रदेशातलं पिटुकलं गाव. नकाशात कदाचित मिळणारही नाही असं. या गावाला जगाच्या नकाशावर शमीने आणलं. शमीचे वडील क्रिकेट खेळायचे. घर चालवण्याची जबाबदारी पडल्यावर त्यांचं क्रिकेट मागे पडलं. तौसिफ यांनी शमीत एक होतकरु खेळाडू पाहिला. सहसपूरमध्ये शमीच्या नैपुण्याला पैलू पाडायला व्यवस्था नव्हती. वीजपुरवठाही दिवसातून ठराविक वेळच व्हायचा. शमीचा भाऊही क्रिकेट खेळायचा पण किडनीच्या आजारामुळे त्याचं क्रिकेट बंद झालं. मोराबादजवळच्या सोनकपूर इथे शमीने बद्रुदीन सिद्दीक यांच्याकडे क्रिकेटची धुळाक्षरं घोटली. उत्तर प्रदेशात क्लब-जिमखाने, निवड चाचणी ही प्रक्रिया अभावानेच व्हायची. सिद्दीक यांच्या ओळखीने शमीला कोलकाताला पाठवायचं ठरवलं. सहसपूर पासून कोलकाता एकदमच दूर. भाषाही वेगळी. पैसेही नव्हते, संसाधनंही नव्हती.
क्रिकइन्फो संकेतस्थळासाठी लिहिलेल्या लेखात सिद्धार्थ मोंगा यांनी शमी नावाच्या हिऱ्याला कसे पैलू पडले ते विस्तृतपणे लिहिलंय. डलहौसी क्लबच्या सुमन चक्रवर्ती यांनी देबब्रत दास यांना बोलावलं. एक गुणवान मुलगा आहे, त्याचा खेळ पाहायला या. दास हे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे माजी अधिकारी. चक्रवर्ती यांचं आर्जव पाहून ते त्वरेने दाखल झाले. त्या मुलाची गोलंदाजी पाहून त्यांनी विचारलं, कुठला आहेस? शमीने सांगितलं- सहसपूर, उत्तर प्रदेश. ७५००० प्रतिवर्ष आणि जेवणासाठी दिवसाला १०० रुपये असं मी देऊ शकतो. चालेल? शमी म्हणाला- हो पण एक अडचण आहे. दास म्हणाले काय? शमी म्हणाला मी राहू कुठे. मला इथे घर नाही. दास यांनी क्षणभर विचार करुन सांगितलं, माझ्याकडे. माझ्या घरी राहा. एक युवा खेळाडू आपल्या घरी राहायला असेल असं दास यांनी पत्नीला सांगितलं. घराची व्यवस्था झाली, पैसेही मिळणार होते. शमीने होकार भरला आणि तेव्हापासून हा किमयागार फलंदाजांची भंबेरी उडवतो आहे.
दास यांच्या टाऊन क्लबतर्फे खेळण्यापूर्वी शमी डलहौसी अॅथलेटिक क्लबसाठी खेळत असे. पण चक्रवर्ती आणि बाकी पदाधिकाऱ्यांना शमीने मोठ्या क्लबसाठी खेळावं असं वाटलं. टाऊन क्लबचा शमी प्रमुख गोलंदाज झाला. त्याचं नाव होऊ लागलं. पश्चिम बंगाल हा डोमेस्टिक क्रिकेटमधला तसा दुर्लक्षितच संघ. सौरव गांगुली निवृत्त झाल्यानंतर पश्चिम बंगालकडून फारच कमी खेळाडू भारतासाठी खेळले. टळटळीत उन्हात, रिकाम्या स्टेडियममध्ये, ट्रेनने प्रवास करुन बंगालसाठी शमी असंख्य सामने खेळला. ऑफस्टंप उडवण्याची, छाताडावर उसळता चेंडू टाकण्याची, अंगठा तोडणारा यॉर्कर फेकण्याची त्याची क्षमता सगळ्यांसमोर होती. अखेर तो दिवस उजाडला. ठिकाण होतं- राजधानी दिल्लीचं कोटला म्हणजेच आताचं अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम. तारीख होती- त्यादिवशी दिल्लीतलं तापमान होतं ५ डिग्री सेल्सिअस. पश्चिम बंगालच्या अशोक दिंडाऐवजी त्याचाच सहकारी शमीला भारताची कॅप देण्यात आली. थंडगार दिल्लीने त्यादिवशी शमीतली आग पाहिली. पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा डाव १६७ धावातच आटोपला. पण भारताने हार मानली नाही. सईद अजमल शमीची पहिली विकेट होती. तो धोनीचा २००वा झेल होता. हाडं गोठवणाऱ्या थंडीत मोहम्मद शमीचे आकडे होते ९-४-२३-१. पदार्पणाच्या लढतीत शमीने चार निर्धाव षटकं टाकली होती. पाकिस्तानचा डाव १५७ धावात गुंडाळला आणि भारताने विजय मिळवला. शमीची जादू जगाने पाहिली. हा मुलगा वेगळाच आहे याची जाणीवही झाली.
शमीची इथपर्यंतची कहाणी अनेकांसारखीच. गावातून सुरुवात, शहरात येऊन संघर्ष नेहमीचाच. भारतीय संघात येणं हा शमीच्या प्रवासातला सर्वोच्चबिंदू होता. पण त्यानंतर सुरू झालं एक काळोखं खोल गर्तेतलं पर्व. २०१४ मध्ये शमी आणि हसीन जहाँ यांचं लग्न झालं. भारतीय क्रिकेटपटूची पत्नी ही आपसूकच सेलिब्रेटी होते. पुढच्या काही वर्षात नेमकं काय झालं कुणालाही कळलं नाही कारण विषय अगदीच खासगी असा. २०१८ मध्ये हसीन यांनी शमीविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली. घरगुती हिंसाचार, हत्येचा प्रयत्न, अन्य महिलेबरोबर अफेअर आणि व्यभिचार. सगळीच कलमं गंभीर. सिद्ध झाल्यास तुरुंगवास नक्की होता. शमीने सगळे आरोप फेटाळले. माझी कारकीर्द संपवण्याचा हा कट आहे असं त्याने सांगितलं. एवढं पुरेसं नाही म्हणून पत्नीने शमीवर मॅचफिक्सिंगचा आरोप केला. या आरोपाने शमीची कारकीर्द पणाला लागली. बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार काही काळासाठी रोखला. फिक्सिंगच्या आरोपांसंदर्भात शमीची कसून चौकशी झाली. त्यात तो निर्दोष ठरला. त्यानंतर लगेचच त्याला वार्षिक करार सूचीत समाविष्ट करण्यात आलं. अन्य आरोपांसाठी खटला, सुनावणी सुरूच राहिली. त्याला न्यायालयाने समन्सही बजावलं.
शमीशी लग्न होण्यापूर्वी जहाँ मॉडेल आणि चीअरलीडर म्हणून काम करत होत्या. शमीने आपल्या पत्नीसह फोटो सोशल मीडियावर टाकले. त्यावरुनही त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. २०१५ मध्ये शमी-जहाँ दांपत्याला मुलगी झाली. त्यानंतर काही वर्षातच सगळं विस्कटत गेलं. यंदाच्या वर्षी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शमीने पत्नीला मुलीच्या सांभाळाकरता प्रति महिना १ लाख ३० हजार रुपये द्यावेत असा आदेशच दिला. मुलीची कस्टडी जहाँ यांच्याकडे आहे. मुलीची कस्टडी मिळावी यासाठी शमीने कायदेशीर लढा दिला. पण त्याला यश मिळू शकले नाही. या सगळ्यादरम्यान शमीच्या नावाने अटकेचं वॉरंटही निघालं. या सगळ्यात बरोबर कोण, चूक कोण हा भाग तूर्तास बाजूला ठेऊया. शमीला घरच्यांची साथ मिळाली. त्यांच्यामुळेच तो खेळावर लक्ष केंद्रित करू शकला. पण हा काळ अतिशय कठीण असल्याचं शमीने अनेकदा सांगितलं आहे. कोरोना लॉकडाऊन काळात इन्टाग्राम लाईव्हदरम्यान तीनवेळा आत्महत्येचा विचार केला होता असा धक्कादायक खुलासा शमीने केला. मी काही बरंवाईट करुन घेऊ नये यासाठी घरचे माझ्याबरोबर एकाला कुणाला तरी ठेवत असत असंही शमीने सांगितलं. याच काळात शमीचा एक अपघातही झाला. डेहराडूनहून दिल्लीला येत असताना हे घडलं. त्याच्या डोक्याला मार लागला. डोळ्याच्या वर दुखापत झाली. सुदैवाने जीव वाचला.
हे सगळं घडत असताना शमी खेळत राहिला. त्याचा फॉर्म कमी जास्त होत राहिला. शमीचं वर्णन करताना भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली म्हणाला होता, शमी इज गन बॉलर. हे अगदीच खरं आहे याचा प्रत्यय शमीचे चेंडू देतात. आयपीएल स्पर्धेत शमी किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी खेळायचा. रवीचंद्रन अश्विन त्याचा कर्णधार होता. शमीला इंग्रजी फार येत नाही. अश्विनला हिंदी जेमतेमच येतं. शमीला मी तामीळ भाषेत सूचना देत असे, त्याला ते कसं कळत असे माहिती नाही पण मला काय म्हणायचं आहे ते शमीला कळत असे आणि त्यानुसार तो अंमलबजावणीही करत असे अशी आठवण अश्विनने सांगितली होती. शमीला बिर्याणी द्या, तो तुम्हाला विकेट देईल. असं त्याचा भारतीय संघातील सहकारी इशांत शर्माने सांगितलं होतं. फलंदाजांनी पिटाई केल्यावरही शमी खचला नाही. पुढच्या सामन्यात नव्या जोशाने तो खेळायला उतरे. कामगिरीत सातत्य नसल्याने त्याला संघातून वगळण्यातही आलं. फिटनेसचा मापदंड असणाऱ्या योयो टेस्टमध्ये शमी पास होऊ शकला नाही. संघात राहायचं असेल तर फिटनेस चांगला करावा लागेल हे समजलेल्या शमीने जिममध्ये घाम गाळायला सुरुवात केली.
चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत शमीला चारच सामन्यात संधी मिळाली. त्यात त्याने एक हॅट्ट्रिक मिळवली. चार वर्षात शमी संघात आतबाहेर होत राहिला पण त्याच्या गोलंदाजीतली भेदकता संघव्यवस्थापनाला माहिती होती. त्यामुळेच वर्ल्डकप संघात त्याचं नाव होतं. संघाचं संतुलन राखण्याच्या दृष्टीने शमीला सुरुवातीच्या काही सामन्यात खेळवण्यात आलं नाही. शार्दूल ठाकूर त्याच्या जागी खेळला. अष्टपैलू हार्दिक पंड्याला दुखापत झाली आणि भारतीय संघाने शमीला संधी दिली. पुढच्या तीन सामन्यात शमीने १४ विकेट्स पटकावल्या. त्यात एकदा डावात पाच विकेट्स मिळवल्या. संधीचं सोनं करणं म्हणतात ते याला. पत्रकार परिषदेत त्याला उशिरा मिळालेल्या संधीबाबत विचारण्यात आलं. त्यावर शमी म्हणाला, वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा मला अंतिम अकरात संधी मिळाली नाही. पण याचं कोणतंही वैषम्य माझ्या मनात नाही. संघाचं संतुलन लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात. संधी आली की सर्वोत्तम योगदान द्यायचं हे मनाशी पक्कं होतं. हार्दिकला दुर्देवाने दुखापत झाली. मला संधी मिळाली. मी किती विकेट्स घेतल्या यापेक्षा संघाच्या विजयात योगदान देता येतंय हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.
२०२१ ट्वेन्टी२० वर्ल्डकपदरम्यान शमीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. शमीची कामगिरी लौकिकाला साजेशी नव्हती. पण संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सहकारी शमीच्या पाठीशी भक्कम उभे राहिले. देशासाठी खेळणाऱ्या कोणत्याही खेळाडूचं असं ट्रोलिंग करु नका असा सल्ला कोहलीने ट्रोलर्सना दिला होता. वैयक्तिक आयुष्यात बरंच काही पाहिलेल्या शमीने ट्रोलर्सना खेळातून उत्तर दिलं.
भारतीय क्रिकेटचाहत्यांसाठी ऐंशी नव्वदीची दशकं वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे वेगवान गोलंदाजांनी हरखून जाण्यात गेली. प्रतिस्पर्ध्यांना भीती वाटेल असा गोलंदाज शमीच्या रुपात तयार व्हायला अनेक दशकं गेली. जवागल श्रीनाथ-वेंकटेश प्रसाद, झहीर खान, आशिष नेहरा, आरपी सिंग यांनी पाया रचला. शमी, बुमराह त्यावर कळस चढवण्याचं काम करत आहेत.
शमीला झोपायला खूप आवडतं. बिर्याणी आणि ऑफस्टंप एवढीच त्याची भूक आहे. मॅचफिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीने शमीकडे मुलाखतीसाठी आग्रह धरला. त्यावेळी तो बोलला- देशासाठी इमान विकण्यापेक्षा मी मरणं पसंत करेन. हे बोलताना त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. परवा वानखेडेवर श्रीलंकेचं पानिपत केल्यानंतर शमीने विकेटचा आनंद साजरा केला. तो हलकेच खाली बसला. तोवर बाकी सहकाऱ्यांनी मिळून त्याच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला उभं केलं, शुभेच्छा दिल्या. शमीने लगेचच चेंडू डोक्यावर ठेऊन ड्रेसिंगरुमच्या दिशेने खूण केली. गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी पडत्या काळात साथ दिली, म्हणून त्यांना अभिवादन केलं असं शमीने नंतर सांगितलं.
विश्वचषकाचा करंडक जिंकण्यासाठी भारतीय संघाला तांत्रिकदृष्ट्या आता दोन सामन्यात विजय हवा आहे. भारतीय संघाने बिर्याणीचा मुबलक पुरवठा केल्यास शमी देशवासीयांचं एक तपाचं विश्वविजेते होण्याचं स्वप्न पूर्ण करुन देऊ शकतो.