Moin Khan warns Team India for Champions Trophy 2025 : पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची तयारी जोरात सुरू आहे, मात्र या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. राजकीय मुद्द्यांवरून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे, त्याचा परिणाम क्रिकेटवरही दिसून येत आहे. २०१२ पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की यावर चर्चा सुरु आहे. अशात पाकिस्तानचा माजी खेळाडू मोईन खाने टीम इंडियाबद्दल मोठे वक्तव्य केलं आहे.
मोईन खानने टीम इंडियाला दिला इशारा –
भारताने २००८ मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. २०२३ मध्ये जेव्हा पाकिस्तानला आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद मिळाले, तेव्हाही भारताने शेजारच्या देशात जाण्यास नकार दिला होता, त्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलच्या आधारे खेळवण्यात आली होती. अशा परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ देखील अशाच पद्धतीने आयोजित केली जाऊ शकते. मात्र, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू भारतात येऊन पाकिस्तानात खेळण्याचा आग्रह धरत आहेत. अलीकडेच पाकिस्तानचा माजी कर्णधार मोईन खान याने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येण्याचा इशारा दिला आहे.
भारताने आपल्या वचनबद्धतेचे पालन केले पाहिजे –
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानमध्ये आला नाही, तर पाकिस्ताननेही भारतात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्याचा विचार करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तान गेल्या वर्षी वर्ल्ड कप २०२३ साठी भारतात आला होता. मोईन खानने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगितले की, “भारताने आयसीसीसोबत केलेल्या आपल्या वचनबद्धतेचे पालन केले पाहिजे आणि जर ते पूर्ण झाले नाही, तर पाकिस्तानने भविष्यात भारतात होणाऱ्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा.”
मात्र, याशिवाय मोईन खानने सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांसारख्या दिग्गज खेळाडूंना बीसीसीआयची समजूत काढण्याची विनंती केली. मोईन खान म्हणाला, “सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, कपिल देव, राहुल द्रविड यांसारख्या माजी भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांच्या क्रिकेट बोर्डांना राजकारणापासून क्रिकेट दूर ठेवण्यास सांगितले पाहिजे. कारण राजकीय मुद्द्यांवरून खेळात व्यत्यय आणू नये. चाहत्यांना भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहायला आवडतो. याचा फायदा केवळ पाकिस्तानलाच होणार नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वालाही होईल.”