मोझेस हेन्ऱीक्सची अष्टपैलू कामगिरी आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे झेल या बळावर सिडनी सिक्सर्सने बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जचा चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात १४ धावांनी पराभव केला. अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये हेन्ऱीक्सने पाच चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी करीत फक्त २३ चेंडूंत नाबाद ४९ धावांची घणाघाती खेळी साकारली. त्यामुळेच ब-गटातील या सामन्यात सिडनी संघाला ५ बाद १८५ असे अवघड आव्हान उभे करता आले. त्यानंतर ३ षटकांत २३ धावांत ३ बळी घेत त्याने चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला.
मोठय़ा आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने १६व्या षटकापर्यंत धावांची गती चांगली राखली होती. अखेरच्या चार षटकांत त्यांना ५० धावांची आवश्यकता होती. पण दोन फलंदाज दुर्दैवीरीत्या झेलबाद झाले आणि चेन्नईला ९ बाद १७१ धावांपर्यंतच मजल मारता आली.
चेन्नईकडून सुरेश रैनाने झुंजार फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने ३३ चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांनिशी ५७ धावा केल्या. सीमारेषेपासून इंचाच्या अंतरावर स्टीव्हन स्मिथने त्याचा नेत्रदीपक झेल टिपला. त्यानंतर दोन चेंडूंच्या अंतराने कप्तान महेंद्रसिंग धोनी बाद झाला. जोश हॅझलवूडने सूर मारत त्याचा लाजवाब झेल घेतला.
सिडनी सिक्सर्सची चेन्नईवर मात
मोझेस हेन्ऱीक्सची अष्टपैलू कामगिरी आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे झेल या बळावर सिडनी सिक्सर्सने बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जचा चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात १४ धावांनी पराभव केला.
First published on: 15-10-2012 at 04:58 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moises henriques chennai super kings sydney sixers cricket champions league