Adil Osmanov won bronze medal in Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अनेक वेळा पदक जिंकल्यानंतर खेळाडू सेलिब्रेशन करताना खूप उत्साही दिसतात. मोल्दोव्हाचा ज्युडोपटू आदिल ओस्मानोव्ह यानेही असेच काहीसे केले, पण त्याचे सेलिब्रेशन फार काळ टिकू शकले नाही. कारण विजयानंतर सेलिब्रेशन करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिल ओस्मानोव्हला दुखापत झाल्याचा व्हिडीओ व्हायरल –

इटलीच्या मॅन्युएल लोम्बार्डोला पराभूत केल्यानंतर त्याने अतिशय वेगाने उडी मारली आणि गुडघ्यावर खाली बसला. यावेळी त्यांचा खांदा निखळला. लगेच त्याने दुसऱ्या हाताने त्या खांद्याला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर त्याला वैद्यकीय सेवा देण्यात आली. वैद्यकीय उपचारानंतर तो पदक समारंभास उपस्थित राहू शकला. त्याने आणि जपानच्या सोची हाशिमोटोने ज्युडो ७३ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. अझरबैजानच्या हिदायत हयारोवने सुवर्णपदक तर फ्रान्सच्या जीन बेंजामिन गाबाने रौप्यपदक पटकावले.

आदिल ओस्मानोव्हने दुखापतीबद्दल काय सांगितले?

सामन्यानंतर आदिलने सांगितले की पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी त्याला डॉक्टरांनी खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. या सामन्यादरम्यानही त्याला समस्या जाणवत होत्या. दुखापतीबाबत तो म्हणाला, ‘माझ्यासाठी हे अवघड होते. वॉर्म अप करतानाही मला बरे वाटत नव्हते. पण याआधीच्या सामन्यांमध्ये दुखापतींशी झुंजत असतानाही मी पदके जिंकली आहेत. माझ्याकडे माघार घेण्यासाठी कोणताही पर्याय नव्हता.’

हेही वाचा – Swapnil Kusale Won Bronze : धोनीला आदर्श मानणारा करवीरनगरीचा शिलेदार, कोण आहे स्वप्नील कुसाळे? जाणून घ्या

वडिलांना समर्पित केले पदक –

आदिल ओस्मानोव्ह वडिलांना पदक समर्पित करताना म्हणाला, ‘माझ्या वडिलांना ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवायचे होते, परंतु आर्थिक अडचणींमुळे ते हे करू शकले नाहीत. यानंतर त्यांनी माझ्यासाठी तेच स्वप्न पाहिले. माझ्या विजयानंतर आज माझ्या वडिलांचे स्वप्नही पूर्ण झाले आहे.’

हेही वाचा – Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने रचला इतिहास; ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पटकावलं कांस्य

भारताने किती पदके जिंकली –

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सहाव्या दिवशी म्हणजे गुरुवारी (१ ऑगस्ट) नेमबाज भारताच्या स्वप्नील कुसाळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. त्यामुळे तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moldovan judo star adil osmanov dislocates shoulder after won bronze medal in paris olympics 2024 video viral vbm