फिफा विश्वचषकाला सुरुवात होण्याआधीच इटलीला मोठा धक्का बसला आहे. आर्यलडविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात इटलीचा मधल्या फळीतील खेळाडू रिकाडरे मोन्टोलिव्हो याचा डावा पाय मोडला आहे. तसेच अल्बेटरे अकिलानी हासुद्धा दुखापतीमुळे पहिल्या सत्रानंतर माघारी परतला. हा सामना ०-० असा बरोबरीत सुटला.
एसी मिलानचा कर्णधार असलेला मोन्टोलिव्होची चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी आर्यलडचा बचावपटू अ‍ॅलेक्स पिअर्स याच्याशी झटापटी सुरू होती. याच प्रयत्नांत दुखापत झाल्यामुळे मोन्टोलिव्हो जागीच कोसळला. त्याच्यावर बराच वेळ उपचार सुरू होते, पण पायाचे हाड मोडल्याचे ध्यानात येताच त्याला उचलून मैदानाबाहेर नेण्यात आले. ‘‘मोन्टोलिव्होच्या समावेशाविषयी सांशकता आहे,’’ असे इटली संघाचे फिजिओ एन्रिको कॅस्टलाकी यांनी सांगितले.
इटलीचा फिफा विश्वचषकातील पहिला सामना १४ जून रोजी इंग्लंडशी होणार आहे.
अन्य सराव सामन्यात, नेदरलँड्सने घाना संघावर १-० असा विजय मिळवला.