आतापर्यंत गेली काही वर्षे फक्त आपण दुहेरीतच बलवान राहिलो आहोत. मात्र एकेरीत कमकुवत राहिल्यामुळे अपेक्षेइतके यश भारताला डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत मिळविता आलेले नाही, असे ज्येष्ठ डेव्हिसपटू आनंद अमृतराज यांनी सांगितले. देशातील नामवंत खेळाडूंचा समावेश असलेल्या महाराष्ट्र टेनिस लीग स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान अमृतराज म्हणाले, ‘‘काही वर्षांपूर्वी भारतीय संघ डेव्हिस स्पर्धेत आव्हानात्मक मानला जात होता, मात्र कालांतराने आपल्या संघाची कामगिरी खराब झाली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे एकेरीतील अपयश. दुर्दैवाने आपल्याकडे एकेरीतील लढतींबाबत अपेक्षेइतके महत्त्व दिले गेले नाही. स्पेन, सर्बियाच्या खेळाडूंनी एकेरीवर अधिक लक्ष दिल्यामुळे या देशांनी डेव्हिस स्पर्धेत यश मिळविले आहे.