गेल्या काही काळापासून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडूंचे वेळापत्रक वाढले आहे. याबाबत अनेकदा खेळाडू उघडपणे बोलले आहेत. अनेक सर्वोत्तम खेळाडूंनी व्यस्त वेळापत्रकामुळे क्रिकेटच्या एका फॉरमॅटमधून निवृत्तीही घेतली आहे. आता दरवर्षी आयसीसी स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. खेळाडूंसोबतच प्रेक्षकही कंटाळले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
स्टीव्ह वॉ चा विश्वास आहे की लोकांना खूप क्रिकेट बघायला मिळत आहे आणि व्यस्त वेळापत्रकामुळे तो निराश झाला आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियन संघाच्या व्यस्त वेळापत्रकाच्या संदर्भात वॉ म्हणाला की, “प्रेक्षकांना सामन्यांशी जुळवून घेणे खूप कठीण झाले आहे.” टी२० विश्वचषक फायनलच्या तीन दिवसांनंतर, चॅम्पियन इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली, ज्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पुरुष संघाच्या सामन्यांच्या वेळापत्रकाबद्दल टीकेला सामोरे जावे लागले. ही एकदिवसीय मालिका पाहण्यासाठी फारच कमी प्रेक्षक मैदानावर पोहोचले.
काय म्हणाला स्टीव्ह वॉ
एसईएनवरील एका कार्यक्रमात वॉ म्हणाला, “इतके क्रिकेट घडत आहे सध्या की, त्याचा मागोवा ठेवणे खूप कठीण झाले आहे. एक प्रेक्षक म्हणून त्याच्याशी जुळवून घेणे खूप कठीण आहे. इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळण्यात काही अर्थ आहे असे वाटत नाही, म्हणजे ते कशासाठी खेळत होते याचे अजून उत्तर मिळाले नाही. बरेच प्रेक्षक सामने पाहण्यासाठी आले नाहीत, मला वाटते की लोकांना खूप क्रिकेट पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा ओव्हरडोस झाला आहे, गरजेपेक्षा कोणतीही गोष्ट ही वाईटचं असते असे तो म्हणाला.” यजमान असण्याव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाने गतविजेते म्हणून शेवटच्या टी२० विश्वचषकात प्रवेश केला होता, परंतु तरीही त्यांच्या पाच सुपर १२ सामन्यांसाठी स्टेडियमची सरासरी उपस्थिती केवळ ३७,५६५ होती. यामध्ये एमसीजीमधील इंग्लंडविरुद्ध रद्द झालेल्या सामन्याचाही समावेश आहे.
स्टीव्ह वॉ पुहे बोलताना म्हणाला, “तुम्हाला अॅशेस किंवा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसारख्या विशिष्ट मालिकेचे आकर्षण हवे आहे. ऑस्ट्रेलियन संघ प्रत्येक वेळी वेगळा संघ मैदानात उतरत असल्याने त्यांच्याशी जुळवून घेणे कठीण होत आहे.” ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार असलेला वॉ म्हणाला, “चाहते आणि खेळाडूंना एकमेकांशी जोडणे कठीण होणार आहे कारण कोण खेळत आहे हे तुम्हाला ठाऊक नाही, यात कोणाची चूक आहे की नाही हे मला माहित नाही. परंतु तुम्हाला सातत्य ठेवायला हवे आहे. तुम्हाला प्रत्येक सामन्यात संघात कोण खेळत आहे हे माहित असले पाहिजे, तुम्हाला त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागेल आणि सध्या ते करणे खूप कठीण झाले आहे.”