माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनी यष्टीरक्षणातील कमकुवत बाजूंवर विशेष लक्ष पुरवल्यामुळेच मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करू शकलो, अशी प्रांजळ कबुली भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शनिवारी व्यक्त केली.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेद्वारे पदार्पण करणाऱ्या पंतला सुरुवातीच्या काळात यष्टीरक्षण करताना फार अडचणी जाणवत होत्या. त्यामुळे काहींनी त्याच्यावर टीकेचा भडिमारसुद्धा केला. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने संपूर्ण मालिकेत २० झेल पकडले, त्याशिवाय अ‍ॅडलेड कसोटीत तब्बल ११ झेल घेत विक्रमही रचला.

‘‘इंग्लंडमध्ये यष्टीरक्षण करणे हा एक वेगळा अनुभव होता. त्या दौऱ्यानंतर मी मोरे यांच्यासह राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे मार्गदर्शन घेतले. झेल घेताना हाताची व शरीराची संरचना किंवा पायांचा वापर कशा रीतीने केला पाहिजे, याबाबत त्यांनी कानमंत्र दिले,’’ असे पंत म्हणाला.

‘‘युवा वयातच संघात संधी मिळाल्यावर तुम्ही मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घेण्यात उत्सुकता दाखवली पाहिजे. इंग्लंडमध्ये ज्या वेळी मी शतक झळकावले त्या वेळी माझा आत्मविश्वास कमालीचा उंचावला. तेव्हापासून प्रत्येक सामन्यानुसार स्वत:च्या खेळात अधिकाधिक सुधारणा कशी करता येईल, यावरच मी लक्ष दिले. इंग्लंडमध्ये सुरू झालेल्या या प्रक्रियेचेच फळ मला ऑस्ट्रेलियात मिळाले,’’ असे पंतने सांगितले.

स्वत: मोरे यांना पंतच्या यष्टीरक्षण कौशल्याविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘पंत नेहमी अधिक हालचाल करण्यावर भर द्यायचा. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर मी त्याला थोडय़ा खुल्या पद्धतीने उभे राहण्याचा सल्ला दिला. यामुळे तुमचा तोल योग्य राहतो व डोकेसुद्धा स्थिर राहते. महेंद्रसिंह धोनीच्या यशामागील गुपित हेच आहे.’’

‘‘त्याशिवाय यष्टीरक्षण करताना हात गोलंदाजाच्या दिशेने न ठेवता नेहमी मैदानाच्या दिशेला असावे. त्यामुळे हाताला दुखापत होण्याचा धोका टळतो व झेल घेण्याची संधी वाढते, असे मी पंतला सुचवले,’’ असेही मोरे यांनी नमूद केले.

Story img Loader