क्रिकेटविश्वात खळबळ उडवून देणाऱ्या आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात आणखी काही क्रिकेटपटू दिल्ली पोलिसांच्या गळाला लागण्याची चिन्हे आहेत. एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्स संघातील ब्रॅड हॉग, केव्हिन कूपर आणि सिद्धार्थ त्रिवेदी यांच्याशीही सट्टेबाजांनी संपर्क साधल्याचे उघड झाले आहे. तर अन्य आयपीएल संघातील काही गोलंदाजांची नावेही यातून समोर येत आहेत.   
भारतीय क्रिकेटला काळिमा फासणाऱ्या या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अजित चंडिला हा मुख्य आरोपी असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांना ‘फिक्सिंग’साठी राजी करणाऱ्या चंडिलाने राजस्थान रॉयल्स संघातील ब्रॅड हॉग, केव्हिन कूपर आणि सिद्धार्थ त्रिवेदी यांना ‘स्पॉट-फिक्सिंग’ करण्यासाठी सट्टेबाजांच्या एका पार्टीचे निमंत्रण दिले होते. या तिघांनी पार्टीचे निमंत्रण धुडकावून लावल्याचे चौकशीत समोर आले. गुरुवारी बुकी म्हणून अटक करण्यात आलेला अमित सिंग हाही राजस्थान रॉयल्सचा माजी क्रिकेटपटू असून त्याने २०१२मध्येही राजस्थानचा एक सामना फिक्स असल्याचे चौकशीत सांगितले.
तिन्ही क्रिकेटपटूंना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी तिघांची कसून चौकशी केली. या तिघांनीही आपल्या गुन्ह्य़ाची कबुली दिल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. सट्टेबाज जिजू जनार्दन याने मला स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अडकवले, अशी कबुली श्रीशांतने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशीही ‘सोय’
सट्टेबाजांकडून क्रिकेटपटूंना फक्त पैसाच देण्यात आला नाही तर क्रिकेटपटूंना दोन वेळा मुली पुरवण्यात आल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत. मुंबईतील कार्टर रोड परिसरातून श्रीशांत आणि बिजूला अटक करण्यात आली, त्यावेळी त्यांच्यासोबत तरुणी होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More rajasthan royals players under spot fixing radar