श्रीलंकेविरुद्ध कसोटी आणि वन-डे सामन्यांची मालिका भारतीय संघाने जिंकली असली तरीही भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर हे नाराज आहेत. भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंवर गावसकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. निवड समितीने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वगळून केवळ स्टाईल मारणाऱ्या खेळाडूंना संघात जागा दिली असल्याचं गावसकर यांनी म्हणलंय.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत निवड समितीने ज्या पद्धतीने भारतीय संघ निवड केला आहे, यावरुन असं वाटतंय की, “मैदानात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंऐवजी फक्त चांगली हेअरस्टाईल, टॅटू असणाऱ्या खेळाडूंना संघात जागा मिळाली आहे. त्यामुळे चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी आता आपल्या हेअस्टाईलकडे लक्ष द्यायला हवं”, असा उपरोधीक टोलाही गावसकर यांनी निवड समितीला लगावला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पहिल्या चार सामन्यांमध्ये लोकेश राहुलला संघात जागा मिळाली. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यात चांगली कामगिरी करुनही अजिंक्य रहाणेला संघात जागा मिळाली नाही. शिखर धवन भारतात परतल्यानंतर अजिंक्य रहाणेला संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे एखादा चांगला फलंदाज बाहेर बसून राहणं दुर्दैवी असल्याचं गावसकर म्हणाले.
चांगली कामगिरी करुनही रहाणेला वन-डे संघात जागा मिळत नसेल तर निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर शंका निर्माण होते. आगामी विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन भारतीय संघात जास्तीत जास्त तरुण खेळाडूंना संधी मिळणं गरजेचं असल्याचं अनेक खेळाडूंनी बोलून दाखवलं होतं. गावसकरांनी कोणाचही नाव घेतलं नसलं तरीही त्यांच्या टिकेचा रोख हा हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यासारख्या तरुण खेळाडूंकडे असल्याचं स्पष्ट होतंय.