वृत्तसंस्था, दोहा : मोरोक्कोच्या संघाने अनपेक्षित, अविश्वसनीय कामगिरी करताना विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र बुधवारी उपांत्य फेरीत मोरोक्कोची सर्वात मोठी कसोटी लागणार असून त्यांच्यापुढे गतविजेत्या फ्रान्सचे आव्हान असेल. लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे दिग्गज खेळाडू कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यावर असून फुटबॉलचे भविष्य म्हणून फ्रान्सचा आघाडीपटू किलियन एम्बापेकडे पाहिले जात आहे. एम्बापेने सर्वाच्या अपेक्षा पूर्ण करताना यंदाच्या विश्वचषकात पाच सामन्यांत पाच गोल केले आहेत. त्यामुळे फ्रान्सला पराभवाचा धक्का द्यायचा झाल्यास एम्बापेला रोखणे मोरोक्कोसाठी सर्वात महत्त्वाचे असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोरोक्कोच्या संघाने यंदा भक्कम बचाव आणि शिस्तबद्ध खेळाचे दर्शन घडवताना पाच सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाला केवळ एक गोल करू दिला आहे. त्यांचा गोलरक्षक यासिन बोनो यंदाच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे मोरोक्कोला नमवणे फ्रान्सलाही सोपे जाणार नाही. उपांत्य फेरीच्या या सामन्याला सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास आहे. मोरोक्को हा देश १९१२ ते १९५६ या कालावधीत फ्रेंच राजवटीखाली होता. यंदाच्या स्पर्धेपूर्वी फ्रान्स आणि मोरोक्को या देशांच्या संघांची फुटबॉलच्या मैदानावर तुलना केली जाऊ शकत नव्हती. फ्रान्सने दोन वेळा विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे, तर मोरोक्कोचा संघ केवळ सहाव्यांदा विश्वचषकात खेळतो आहे. मात्र यंदा कतार येथे सुरू असलेल्या स्पर्धेत मोरोक्कोच्या संघाने थक्क करणारी कामगिरी केली आहे.

साखळी फेरीत मोरोक्कोने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमवर मात केली. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेन आणि उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगाल हा युरोपातील दोन बलाढय़ संघांना मोरोक्कोने पराभवाचा धक्का दिला. त्यांच्या या यशात गोलरक्षक बोनो, मध्यरक्षक हकिम झियेश, बचावपटू अश्रफ हकिमी आणि आघाडीपटू एन-नेसरी यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. आता विश्वविजेतेपदाचे स्वप्न कायम राखण्यासाठी मोरोक्कोला गतविजेत्या फ्रान्सला नमवावे लागेल.

यंदाही संभाव्य विजेत्यांच्या यादीत फ्रान्सचे नाव आघाडी होते. एन्गोलो कान्टे, पॉल पोग्बा, करीम बेन्झिमा यांसारखे फ्रान्सचे तारांकित खेळाडू दुखापतींमुळे यंदाच्या विश्वचषकाला मुकले. मात्र त्यांच्या अनुपस्थितीतही फ्रान्सने अप्रतिम कामगिरी केली आहे. साखळी फेरीचा अडथळा सहज पार केल्यानंतर फ्रान्सने उपउपांत्यपूर्व फेरीत पोलंड आणि उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडला पराभूत केले. तसेच एम्बापेसह ऑलिव्हिएर जिरूड आणि अ‍ॅन्टोन ग्रीझमन हे आघाडीपटू पूर्ण लयीत आहेत. त्यामुळे या सामन्यात फ्रान्सचे पारडे जड मानले जात आहे.

  • वेळ : मध्यरात्री १२.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्पोर्टस १८-१, १ एचडी, स्पोर्टस १८ खेल, जिओ सिनेमा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morocco biggest test challenge of defeating defending champion france in the semi final today ysh