Most T20I Wickets, Tim Southee: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये एकूण ४ विकेट्स घेतल्या, यासह त्याने आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये १५० विकेट्सही पूर्ण केल्या. या छोट्या फॉरमॅटमध्ये १५० विकेट्स घेणारा टीम साऊदी जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये टीम साऊदीने मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, अब्बास आफ्रिदी आणि हारिस रौफ या चार फलंदाजांना बाद केले. साऊदीने ४ षटकात २५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
तिसर्या विकेटसह, टीम साऊदीने १५० आंतरराष्ट्रीय टी-२० विकेट्स पूर्ण केल्या आणि हा आकडा गाठणारा पहिला गोलंदाज ठरला. हा त्याचा ११८वा टी-२० सामना होता. सौदीच्या नावावर आता १५१ टी-२० विकेट्स आहेत. टी-२० व्यतिरिक्त टीम साऊदीने वनडेमध्ये २२१ आणि कसोटीत ३७४ विकेट्स घेतल्या आहेत.
सर्वाधिक टी–२० आंतरराष्ट्रीय विकेट्स: सर्वाधिक टी–२० विकेट्स घेणारे पाच गोलंदाज
टीम साऊदी (न्यूझीलंड) : १५१ विकेट्स
शकीब अल हसन (बांगलादेश): १४० विकेट्स
राशिद खान (अफगाणिस्तान) : १३० विकेट्स
ईश सोधी (न्यूझीलंड) : १२७ विकेट्स
लसिथ मलिंगा (श्रीलंका) : १०७ विकेट्स
न्यूझीलंड क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ४६ धावांनी पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केन विल्यमसन आणि डॅरिल मिचेलच्या अर्धशतकांमुळे न्यूझीलंडला २०० हून अधिक धावा करता आल्या. पाकिस्तानला विजयासाठी २२७ धावांचे लक्ष्य मिळाले होते, प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १८० धावांत गारद झाला. न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली, दुसऱ्याच चेंडूवर डेव्हॉन कॉनवे शाहीन आफ्रिदीकडे बाद झाला. मात्र, तिसर्याच षटकात फिन अॅलनने शाहीन आफ्रिदीला २४ धावांवर त्रिफळाचीत करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. अॅलनने १५ चेंडूत ३ षटकार आणि तब्बल ३ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या.
कर्णधार केन विल्यमसनने ४२ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. डॅरिल मिचेलने २७ चेंडूत ६१ धावांची शानदार खेळी केली, ज्यात त्याने ४ षटकार आणि ४ चौकार लगावले. मार्क चॅपमनने शेवटच्या षटकांमध्ये ११ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि अब्बास आफ्रिदी यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या, दोघांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. हारिस रौफने २ विकेट्स घेतल्या.
पाकिस्तान १८० धावांवर ऑलआऊट, डॅरिल मिचेल सामनावीर ठरला
सैम अयुब आणि मोहम्मद रिझवान यांनी धमाकेदार डावाची सुरुवात केली, मात्र तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अयुबचा डाव संपुष्टात आला. त्याने ८ चेंडूत २७ धावा केल्या, ज्यात त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. यानंतर रिझवान आणि बाबर आझमने डाव पुढे नेला, रिझवान १४ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ३५ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. टीम साऊदीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, ज्यात मोहम्मद फिजुआन आणि इफ्तिखार अहमद यांच्या विकेट्सचा समावेश होता. अॅडम मिलने आणि बेन सिअर्सने २-२ तर ईश सोधीने एक विकेट घेतली.