गोरेगाव प्रबोधन येथे आयोजित २५व्या रौप्यमहोत्सवी मुंबई महापौर खो-खो चषक स्पर्धेत व्यावसायिक गटात पश्चिम रेल्वेने जेतेपदावर नाव कोरले. पश्चिम रेल्वेने गतविजेत्या मध्य रेल्वेचा १२-१० असा २ गुण आणि ५.३० मिनिटे राखून पराभव केला. सागर मालपने १.५० आणि २.३० तर अमोल जाधवने २.१०, १.३० मिनिटे नाबाद संरक्षण करताना २ गडीही बाद केले. याच गटात तृतीय क्रमांक मुंबई पोलिसांनी मिळवला. पुरुष विभागात उपांत्य चुरशीच्या सामन्यात उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी संघाने श्री सह्य़ाद्री संघाला १४-१२ असे नमवले. मध्यंतराला मिळवलेली २ गुणांची आघाडी महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीसाठी निर्णायक ठरली. दीपेश मोरेने २.४० मिनिटे संरक्षण करताना विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या लढतीत ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा ३ गुणांनी पराभव केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moyer kho kho cup western railway win