MS Dhoni’s iconic No.7 jersey retired: धोनीची जगप्रसिद्ध नंबर 7 जर्सीबाबत बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर #ThalaforaReason हे हॅशटॅग ७ नंबरसह ट्रेंड होत होते. यापाठोपाठच आता बीसीसीआयचा हा महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे. इंडियन एक्सस्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार धोनीची ७ नंबरची जर्सी ही भारतीय क्रिकेट बोर्डाने निवृत्त केली आहे, यापुढे कोणत्याही खेळाडूला हा क्रमांक नव्याने दिला जाणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतल्याच्या तीन वर्षांनंतर हा निर्णय समोर आला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या १० क्रमांकाच्या जर्सी बाबत सुद्धा हाच निर्णय घेण्यात आला होता. आजवर हा सन्मान मिळवणारा तेंडुलकर हा एकमेव खेळाडू होता त्यापाठोपाठ धोनीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
बीसीसीआयने राष्ट्रीय संघातील खेळाडूंना, विशेषत: पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना तेंडुलकर आणि धोनीच्या जर्सी क्रमांकाचा पर्याय मिळणार नसल्याची माहिती दिली आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “युवा खेळाडू आणि सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंना MS धोनीची 7 क्रमांकाची जर्सी न घेण्यास सांगण्यात आले आहे. धोनीच्या खेळातील योगदानाबद्दल बीसीसीआयने त्याचा जर्सी क्रमांक हा त्याच्याच ओळखीशी जोडून ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. नवीन खेळाडूला 7 क्रमांक मिळू शकत नाही आणि 10 क्रमांक आधीच उपलब्ध क्रमांकांच्या यादीतून बाहेर होता.”
बीसीसीआयच्या निर्णयामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंच्या निवडीवर काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. नियमानुसार, ICC खेळाडूंना 1 ते 100 मधील कोणतीही संख्या निवडण्याची परवानगी देते, परंतु भारतात, पर्याय मर्यादित आहेत. भारतीय संघातील नियमित संघातील खेळाडूंना सध्या “60-विषम संख्या निवडीसाठी उपलब्ध आहेत. तसेच एखादा खेळाडू जवळपास एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ संघाबाहेर असला तरी आम्ही त्याचा नंबर नवीन खेळाडूला दिला जात नाही. याचा अर्थ अलीकडील पदार्पण करणार्या खेळाडूकडे निवडण्यासाठी फक्त 30-विषम संख्या आहेत. ”
या वर्षाच्या सुरुवातीला, २१ वर्षीय सलामीवीर यशस्वी जैस्वालला राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याच्या जर्सीवर १९ क्रमांक हवा होता पण हा क्रमांक क्रिकेटपटू-समालोचक दिनेश कार्तिकला नियुक्त केलेला असल्याने यशस्वीला ६४ क्रमांकाची जर्सी घ्यावा लागला होता. अगदी सर्व स्तरांवर ‘प्रतिष्ठित’ आकड्यांसाठी चढाओढ आहे. अंडर-19 खेळताना , देशातील स्टार खेळाडू शुभमन गिलला सुद्धा आवडता क्रमांक 7 मिळवू शकला नाही कारण तो आधीच घेतला गेला होता. अखेरीस तो 77 व्या क्रमांकावर स्थिरावला. वरिष्ठ संघात स्थान मिळवल्यानंतरही गिल त्याच क्रमांकावर कायम आहे.