दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धावांसाठी झगडणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाची भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पाठराखण केली आहे. याचप्रमाणे मोठे फटके खेळण्यापूर्वी रैनाने आधी खेळपट्टीवर स्थिरावण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला धोनीने दिला आहे.
‘‘रैना मैदानावर गेल्यावर मोठे फटके खेळण्याची घाई करतो. त्याने मैदानावर काही चेंडू खेळल्यावर मग हे फटके खेळणे महत्त्वाचे ठरेल,’’ असे धोनीने रविवारच्या लढतीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
उत्तर प्रदेशचा डावखुरा फलंदाज रैनाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांत फक्त तीन धावा करता आल्या आहेत. या संघाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतसुद्धा त्याला प्रभाव पाडता आला नव्हता.
तिसऱ्या लढतीमधील पराभवाबाबत धोनी म्हणाला, ‘‘पहिल्या सत्रात खेळपट्टीचे स्वरूप वेगळे होते. जसजसा खेळ पुढे गेला, तसतसे खेळपट्टीवर खेळणे अधिक कठीण गेले. खेळपट्टीतील हे बदल दिसून आले नसते, तर गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला २७० धावांत रोखणे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. खेळपट्टी धिमी होत गेल्याने आम्हाला मोठे फटके खेळण्यात अपयश आले.’’
धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. क्रमबदलाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धोनी म्हणाला, ‘‘मी पुढे फलंदाजीला आलो. कारण मला अधिक चेंडू मिळाले तर मला अधिक मोठे फटके खेळता येतील, असा विश्वास होता. याचप्रमाणे पुढील क्रमांकांना न्याय देणारे फलंदाजही मला अजमावायचे होते, हीच यामागील विचारधारा होती.’’
आफ्रिके विरुद्ध रैना
ट्वेन्टी-२० मालिका
१. धरमशाल १४
२. कटक २२
एकदिवसीय मालिका
१. कानपूर ३
२. इंदूर ०
३. राजकोट ०