Happy Birthday Mahendra Singh Dhoni: महेंद्रसिंग धोनी शुक्रवारी (७ जुलै २०२३) ४२वा वाढदिवस साजरा करत आहे. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने २००७ मध्ये भारताची पहिली ICC ट्रॉफी म्हणजेच टी२० विश्वचषक जिंकला. सध्या धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धोनीच्या जीवनाचा रंजक प्रवास…

भारताचा माजी कर्णधार एम.एस धोनी हा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याला केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून प्रेम मिळाले आहे. त्याच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहते विविध गोष्टी करत असतात. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यातील अनेक रंजक गोष्टी आहेत. त्याला लाडाने ‘माही’असेही म्हणतात. झारखंडमधील रांची येथे एका छोट्या गावात लहानाचा मोठा झाल्यामुळे धोनीची राहणी साधी होती. मैदानावर आणि मैदानाबाहेरही माही त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. म्हणूनच त्याला ‘कॅप्टन कूल’ ही उपाधी मिळाली.

धोनी त्याच्या उत्कृष्ट नेतृत्व क्षमतेसाठी ओळखला गेला, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा जिंकल्या. टी२० विश्वचषक, आयसीसी विश्वचषक, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप यांचा त्यात समावेश आहे. तसेच, त्याच्या कारकिर्दीत टीम इंडिया कसोटीमध्ये आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होती. उत्तम नेतृत्व, अप्रतिम फलंदाजी आणि यष्टीरक्षनातील कौशल्यं यामुळेच तो मोठा खेळाडू बनला. एम.एस. धोनीबाबत एक रंजक गोष्ट म्हणजे या वयातही तो इतर तरुण खेळाडूंइतकाच फिट आहे. नुकतेच त्याच्या गुडघ्यावर सर्जरी करण्यात आली असून त्यातून बरा होत आहे.

एम.एस. धोनीची कारकीर्द

महेंद्रसिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी झारखंडमधील रांची येथे झाला. माहीचे वडील पंप ऑपरेटर म्हणून काम करायचे आणि त्याची आई गृहिणी होती. घराजवळील शाळेतच त्याने शिक्षण घेतलं आणि तिथेच क्रिकेटसह, फुटबॉल, बॅडमिंटन अशा विविध खेळांत त्याला आवड असल्याने अभ्यासाबरोबरच तो याचाही सराव करायचा. बिहारच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड होण्यापूर्वी रांचीतील स्थानिक क्रिकेट क्लबमधून धोनी खेळत होता. त्यानंतर तो पूर्व विभागीय अंडर-१९ संघाकडून खेळला, २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ६२ चेंडूत ६८ नाबाद धावांची खेळी साकारत आणि सामन्यात यश मिळवलं.

धोनीने २००४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वन डे सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. आता तो फक्त आयपीएलमध्ये खेळतो. आयपीएल २०२३मध्ये धोनीने चेन्नई सुपर किंग्जला त्याच्या नेतृत्वाखाली विजय मिळवून दिला. चेन्नई आयपीएलमध्ये पाचव्यांदा चॅम्पियन बनली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याचबरोबर असे काही विक्रम आहेत, जे आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही आणि त्यात धोनी पहिल्या क्रमांकावर आहे.

कसोटी, ६० सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेटकीपिंग कर्णधार.

एकदिवसीय डावात सर्वाधिक ६ फलंदाज बाद झाले.

एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक २०० विकेटकीपिंग कर्णधार.

एकदिवसीय सामन्यांमध्ये एका डावात सर्वाधिक ३ स्टंपिंग.

एकदिवसीय सामन्यांमध्ये यष्टिरक्षक म्हणून १८३* धावांची सर्वात मोठी खेळी.

आंतरराष्ट्रीय टी२०च्या एका डावात सर्वाधिक ५ फलंदाज बाद झाले.

टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७२ सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेटकीपिंग करणारा कर्णधार.

टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक ३४ स्टंपिंग.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कर्णधार म्हणून सर्वाधिक ३३२ सामने.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक १९५ स्टंपिंग.

हेही वाचा: Team India: भारतीय संघात निवड न झाल्याने ‘या’ वेगवान गोलंदाजाने व्यक्त केल्या भावना, कॅमेरासमोर रडतानाचा Video व्हायरल

कर्णधार म्हणून अशी आकडेवारी आहे

धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी कर्णधार म्हणून ६० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये टीमने २७ जिंकले आणि १८ गमावले. याशिवाय एकदिवसीय सामन्यांमध्ये धोनीने टीम इंडियासाठी २०० सामन्यांचे नेतृत्व केले, ज्यामध्ये भारतीय संघाने ११० सामने जिंकले आणि ७४ गमावले. त्याच वेळी, टी२० इंटरनॅशनलमध्ये धोनी टीम इंडियासाठी कर्णधार म्हणून ७२ सामने खेळला, ज्यामध्ये टीमने ४२ मॅचमध्ये विजय मिळवला होता आणि टीमने २८ मॅच गमावल्या होत्या.

अशी आंतरराष्ट्रीय कारकीर्द

धोनीने २००४ ते २०१९ या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९० कसोटी, ३५० एकदिवसीय आणि ९८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीच्या १४४ डावात त्याने ३८.०९च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ५०.५७च्या सरासरीने १०७७३ धावा जोडल्या. तसेच, टी२० इंटरनॅशनलमध्ये धोनीने ३७.६०च्या सरासरी आणि १२६.१३च्या स्ट्राइक रेटने १६१७ धावा केल्या. धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण १६ शतके आणि १०८ अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा: Mohammad Shami: सुप्रीम कोर्टाचा मोहम्मद शमीला मोठा झटका, चार वर्षे जुन्या प्रकरणाची पुन्हा होणार सुनावणी

धोनीला आतापर्यंत मिळालेले पुरस्कार

धोनीने आपल्या अफलातून करिअरमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळवले आहेत. माहीला त्याच्या क्रिकेटमधील अप्रतिम कामगिरीबद्दल २००९ मध्ये भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार – पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. धोनीला एक उत्कृष्ट कर्णधार आणि नेतृत्वसाठी २००७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.  

वन डे सामन्यांमध्ये त्याच्या शानदार कामगिरीमुळे माहीला २००८ आणि २००९ मध्ये सलग दोनदा ICC ODI ‘प्लेयर ऑफ द इयर’ म्हणून घोषित करण्यात आलं. २००८, २००९ आणि २०१३ मध्ये तीन वेळा त्याची ICC ‘कॅप्टन ऑफ द इयर’ म्हणून निवड करण्यात आली. टाईम मॅगझिनने जगातील पहिल्या १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये धोनीची निवड केली होती. तसेच, फोर्ब्स मासिकाने जगातील महान खेळाडूंपैकी एक म्हणून त्याची नोंद केली करत यादीत स्थान दिलं.

एम.एस. धोनीला २०११ मध्ये प्रादेशिक सैन्यात ‘लेफ्टनंट कर्नल’ची मानद रँक देण्यात आली होती. त्यावेळी त्याने सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी पुढाकार घेतला आणि अजूनही तो त्यांच्यासाठी काम करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला भेटण्यासाठी २०१९साली धोनीने टीम इंडियासोबत एक दौरा केला होता. धोनीने भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटसोबत दोन आठवड्यांचं प्रशिक्षणही घेतलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni birthday mahendra singh dhoni turns 42 know how his career was from captaincy to batting avw
Show comments