साल २०१९, स्पर्धा विश्वचषक, उपांत्य फेरीत भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि महेंद्रसिंह धोनी हे नाव भारतीय संघापासून काही क्षणांसाठी का होईना वेगळं झालं. एकेकाळी भारतीय संघाचा आधारस्तंभ असलेला महेंद्रसिंह धोनी तब्बल एक वर्षभर संघाबाहेर आहे. संपूर्ण स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीची संथ फलंदाजी हा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यातही गरजेच्या वेळी धोनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही. धोनीने ७२ चेंडूत १ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या. मोक्याच्या क्षणी फटकेबाजी न केल्यामुळे भारतीय संघावरचं दडपण वाढत गेलं आणि सामना न्यूझीलंडने जिंकला. धोनी संथ खेळतो, तो आता पूर्वीसारखा फलंदाजी करत नाही, त्याने आता निवृत्त व्हावं अशा एक ना अनेक चर्चा भारतीय क्रिकेटप्रेमी सोशल मीडियावर ऐकत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारलेली नसली तरीही धोनी क्रिकेटपासून वर्षभर लांब आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत का??? नीट विचार करायला गेलं तर याचं उत्तर हे नाही असंच मिळतं आणि मग पुन्हा आठवण धोनीचीच येते. मग न राहवता एक प्रश्न मनात येऊन जातो, या धोनीचं करायचं तरी काय???

संथ फलंदाजी ठरला कळीचा मुद्दा !

वाढदिवस आहे म्हणून उगाच चांगलं बोलायचं योग्य ठरणार नाही आणि ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काहीच अर्थ नसतो…त्यामुळे थेट मुद्द्यावर येऊया. तुम्ही धोनीचे चाहते असाल…त्याच्याविरोधात एकही शब्द कोणी बोललेलं तुम्हाला पसंत पडत नसेल तरी एक गोष्ट सर्वांना मान्य करावी लागेल की २०१७ पासून धोनीच्या फलंदाजीवर थोड्याफार प्रमाणात फरक पडायला लागला होता. सर्वोत्तम फिनीशर असं बिरुद मिरवणारा, मैदानात उभं राहिल्यानंतर दाणपट्टा चालवल्यासारखा फलंदाजी करणाऱ्या धोनीच्या फलंदाजीची धार कमी झाली होती, म्हणावा तसा खेळ होत नव्हता. एखाद-दुसऱ्या सामन्यात धोनी आपल्या फॉर्मात परतायता…पण ते सगळं क्षणिक वाटायचं. नीट विचार करायला गेला तर यात वावगं काहीच नाही, खेळाडूचं वय जसं जसं वाढत जातं तसं त्याच्या खेळावर परिणाम होत जातो. २०१७ चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारताला पराभव स्विकारावा लागला आणि त्यानंतर भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर गेला. या दौऱ्यातही एका वन-डे सामन्यात भारताला धोनीच्या अशाच संथ खेळीचा फटका बसला होता.

आता यावर धोनीचे चाहते म्हणतील, त्यात काय झालं खेळाडू म्हटल्यावर एक-दोन सामन्यात फॉर्म खराब होणारच. पण माझ्या मते धोनीच्या कारकिर्दीतला उतरणीचा काळ याचदरम्यान सुरु झाला होता. या काळात बीसीसीआयला धोनीचा खुबीने वापर करत ऋषभ पंत किंवा इतर कोणत्याही यष्टीरक्षक-फलंदाजाला संधी देता आली असती. मात्र असं झालं नाही. इतर खेळाडू सोडा, पंतलाही म्हणावी तशी संधी मिळाली नाही आणि कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं हे धोनीच्याच खांद्यावर आलं. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाला विजयाची चांगली संधी होती. या स्पर्धेनंतर धोनी निवृत्ती स्विकारणार अशी चर्चाही होती, पण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि सगळं चित्रच पालटलं.

चतूर कर्णधार आणि सर्वोत्तम यष्टीरक्षक –

सोशल मीडियावर धोनीचे जसे चाहते आहेत तसेच त्याचा राग करणारेही आहेत. अनेकांना धोनी स्वार्थी खेळ करतो असं वाटतं. पण धोनी आवडत नाही अशा प्रत्येक लोकांना ही गोष्ट मान्यच करावी लागेल ती म्हणजे, धोनी भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम यष्टीरक्षक आणि चतूर कर्णधार होता. मराठीमध्ये एक गाणं आहे, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला…. या गाण्यात यष्टीरक्षकाचं वर्णन अगदी सार्थ शब्दांत केलं आहे.

मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव

या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुजला धाव

यष्टीरक्षक हा कोणत्याही क्रिकेट संघाचा खरा कर्णधार असं म्हटलं जातं. यष्टींमागून सामन्याचं पारडं कोणत्या दिशेने झुकतंय याचा अंदाज यष्टीरक्षकाला बरोबर येत असतो. अनुभव आणि मेहनतीच्या जोरावर धोनीने स्वतःला सर्वोत्तम कर्णधार म्हणून तयार केलं यात काही शंकाच नाही. संघात कोणाला संधी द्यायची, गोलंदाजांनी चेंडू कोणत्या टप्प्यावर ठेवायचा, फिल्डींग कुठे लावायची या सर्व गोष्टी धोनी संघात असताना एकहाती सांभाळत होता. फलंदाज कुठे फटका मारणार हे जणू धोनीला आधीपासून माहिती असायचं, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकवेळा धोनीने लावलेला सापळ्यात फलंदाज फसायचा. समोरच्या फलंदाजाच्या डोळ्याची पापणी लवते न लवतो इतक्या वेळात धोनी स्टम्पिंग करुन मोकळा झालेला असतो. प्रसंगी घेऊन टाक म्हणून केदार जाधवला दिलेली शाबासकी आणि गरजेनुसार, डाल रहा हे बॉलिंग या चेंज करु?? म्हणत कुलदीपला सुनावलेले खडे बोल…धोनीने खऱ्या अर्थाने संघावर पकड बसवली होती.

या दोन्ही मुद्द्यांचा नीट विचार केला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की आपण धोनीचाही सचिनच केला. एक खेळाडू संघाला तारेल ही व्यर्थ अशा भारतीय चाहत्यांमध्ये असते. तो खेळाडूही माणूसच आहे, आणि एका ठराविक वयानंतर त्याचा पूर्वीसारखा खेळ होणार नाही हे आपण लक्षात घेत नाही. फलंदाजी असो किंवा यष्टीरक्षक किंवा कर्णधारपद प्रत्येक बाबतीत धोनीने पातळी इतक्या उंचावर नेऊन ठेवली आहे की कोणताही खेळाडू तिथपर्यंत पोहचू शकत नाही. याच दोष धोनीचा मुळीच नाही. इथे बीसीसीआयने योग्यवेळी कठोर पावलं उचलत, पर्याय तयार केला असता तर धोनीच्या निवृत्तीवरुन सुरु असलेलं द्वंदं कदाचीत सुरुच झालं नसतं.

कर्णधार म्हणून धोनीने अनेक खेळाडूंना संधी दिली. ज्यांनी खेळ चांगला केला, त्यांनी संघात स्थान टिकवलं. ज्यांना योग्य खेळ करता आला नाही त्यांनी आपलं स्थान गमावलं. धोनीने अनेकांचं करिअर संपवलं अशी टीका आजही धोनीवर होते. पण भारतीय संघाच्या भल्यासाठी धोनीने ही टीकाही सहन केली. कर्णधाराला जसे प्रसंशेचे बोल आवडतात तसेच त्याला टीकेचे सूरही आवडून घ्यावेच लागतात. नेमकं हेच काम बीसीसीआयला जमलं नाही, २०१९ ला भारताला मोठा फटका बसला आणि अचानक बीसीसीआयला जाग आली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

गेल्या वर्षभरात भारतीय संघाने ऋषभ पंत, लोकेश राहुल आणि संजू सॅमसन या तिघांना यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. परंतू एकाकडूनही भारताला अपेक्षित निकाल मिळाला नाही. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून ज्या पंतकडे पाहिलं जात होतं, त्याचा सुरुवातीच्या दिवसांतला खेळ तर अतिशय वाईट होता. फलंदाजीत बेजबाबदार फटके खेळणं, यष्टींमागची ढिसाळ कामगिरी अशा एक ना अनेक कारणांमुळे पंत चर्चेत होता. संजू सॅमसनला संधी मिळाली नाही म्हणूनही सोशल मीडियावर नाराजी होती, पण मिळालेल्या संधीचा सॅमसनलाही पूर्ण फायदा उचलता आला नाही. न्यूझीलंड दौऱ्यात राहुलने यष्टीरक्षणात आपली चमक दाखवली, पण दीर्घकालीन पर्याय म्हणून राहुल हा योग्य खेळाडू नाही. सगळ्या बाजूने अपयश आल्यानंतर मग पुन्हा आपल्याला आठवण आली ती धोनीची…धोनीला परत बोलवा यार, धोनीच पाहिजे टीममध्ये अशा प्रतिक्रीया आपण ऐकल्या असतील. हे सगळं पाहिल्यानंतर धोनी म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा असल्यासारखा वाटतो, आणि सुरुवातीला पडलेला प्रश्न कायम राहतो, धोनीचं करायचं तरी काय??

Story img Loader