सौरव गांगुलीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीकडे बघितलं जातं. आपल्या कर्णधारपदाच्या काळात धोनीने भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये धोनीची कामगिरी खालावल्यानंतर लगेचच त्याच्यावर निवृत्तीसाठी दबाव यायला लागला. त्यात चॅम्पियन्स करंडकात भारताला पाकिस्तानकडून हार पत्करावी लागली आणि धोनीच्या निवृत्तीच्या मागणीने आणखीनच जोर धरला.

यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात धोनीला संधी मिळाली, मात्र तिकडेही त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध वन-डे सामन्यांसाठी संघ निवडताना निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनीही कामगिरीच्या आधारावर धोनीला संघात जागा मिळेल असं वक्तव्य केलं होतं. मात्र प्रसाद यांच्या वक्तव्यामुळे धोनीचे बालपणाचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी चांगलेच नाराज झाले आहेत.

अवश्य वाचा – VIDEO: …अन् धोनी मैदानावरच झोपला

प्रत्येक निवड समितीप्रमुख एका ठराविक प्रक्रियेनूसार आपला संघ निवडत असतो. मात्र प्रसाद यांना आपलं मत जाहीर करण्याची गरज नव्हती. मी धोनीला लहानपणापासून प्रशिक्षण दिलं आहे. मी त्याला जेवढं ओळखतो तो योग्य वेळ येताच निवृत्ती जाहीर करेल. काही दिवसांपूर्वी धोनी आणि माझं फोनवर बोलणं झालं होतं. यावेळी तो माझ्याशी खूप मनमोकळेपणाने बोलला. “सर, योग्य वेळ येताच मी निवृत्ती जाहीर करीन. कोणासाठीही थांबणार नाही.” त्यामुळे धोनीवर निवृत्तीसाठी दबाव टाकणं योग्य नसल्याचं बॅनर्जी यांनी म्हणलं आहे.

अवश्य वाचा – एक पाय मोडला तरी पाकिस्तानविरुद्ध खेळेन : धोनी

धोनीवर टीका करण्याआधी प्रसाद यांनी आपल्या कामगिरीकडे एकदा नजर टाकायला हवी होती. आतापर्यंत प्रसाद यांनी भारतीय संघात काय कामगिरी केली हे सर्वांना माहिती आहे. १०० वी कसोटी खेळण्याची संधी असतानाही धोनीने काळाची पावलं ओळखत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. जर धोनीला कसोटी खेळायची असती तर तो कसोटी क्रिकेट खेळत राहू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. धोनी हा आपला आतल्या आवाजाचं ऐकतो. त्यामुळे योग्य वेळ येताच धोनी स्वतः निवृत्ती जाहीर करेल, असं म्हणत बॅनर्जी यांनी प्रसाद यांच्यावर टीका केली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शेवटच्या दोन वन-डे सामन्यांमध्ये धोनीने आक्रमक खेळी करत, संघाच्या विजयात मोलाचा हातभार उचलला. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये धोनीच्या निवृत्तीची चर्चा काहीकाळ थांबते का हे पहावं लागणार आहे.

Story img Loader