भारतीय क्रिकेट संघ सध्या विंडीज दौऱ्यावर आहे. भारताने टी २० आणि एकदिवसीय मालिका खिशात घातली आहे. तर कसोटी मालिकेतील पहिला सामनाही भारताने मोठ्या फरकाने जिंकला आहे. या दौऱ्यातून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने माघार घेतली आहे. धोनी दोन महिन्यांसाठी भारतीय लष्करासोबत होता. धोनीकडे लष्कराची लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी आहे. त्यामुळे धोनीने आधी प्रशिक्षण आणि त्यानंतर काश्मीरमधील नेमून दिलेल्या भागात गस्त घालत लष्कर विभागात सेवा दिली. त्या काळात धोनी लष्कराच्या गणवेशात उठून दिसत होता. पण काही दिवसांपूर्वी तो लष्करी सेवा पूर्ण करून घरी परतला. त्यानंतर आता त्याचा एक वेगळा फोटो आणि व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
महेंद्रसिंग धोनी लष्करी सेवेतून परतल्यानंतर सध्या तो काही जाहिरातींच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंगसाठी प्रवास करताना त्याचा एक नवा लूक दिसून येत आहे. या लूकमध्ये त्याने ‘कमांडो’ लूकमध्ये दिसत आहे. त्याने कमांडो बांधतात त्यासारखा काळ्या रंगाचा रूमाल (बंदाना) डोक्याला बांधला आहे.
View this post on Instagram
Recent Click of MS Dhoni with friends from Jaipur! . #Dhoni #MSDhoni #TravelDiary
राजस्थानमधील जयपूरमध्ये तो एका कामासाठी गेला असताना त्याचा हा नवा लूक चाहत्यांच्या नजरेस पडला आणि चाहत्यांना हा लूक प्रचंड आवडला.
धोनी हा सेलिब्रिटी असल्यामुळे तो गस्त घालत असताना त्याच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर असेल? असे प्रश्न काही लोकांकडून उपस्थित करण्यात आले होते. त्यावर “धोनीला सुरक्षा पुरवण्याची गरज भासेल असे आम्हाला अजिबातच वाटत नाही. तो त्याचे रक्षण करण्यास समर्थ आहे. तसेच तो देशवासीयांची रक्षण करण्यासाठीही तप्तर आणि समर्थ आहे. त्याला दिलेले कार्य तो नक्कीच पूर्ण जबाबदारीने पार पाडेल”, असा विश्वास रावत यांनी व्यक्त केला होता.
“सैन्यदलात जेव्हा एखादी व्यक्ती भरती होते, तेव्हा येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ आणि हिंमत त्यांच्यात असते म्हणूनच ते येतात. धोनीने त्याला स्वत:चे आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतले आहे. तो देशातील नागरिकांचे संरक्षण नक्कीच करू शकतो”, असेही ते म्हणाले होते. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत त्याने आपला कार्यकाळ सक्षमपणे पूर्ण केला.