भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलचा झेल घेत त्याने घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २०० झेल घेण्याचा टप्पा पूर्ण केला. यष्टीमागे २०० झेल घेणारा तो भारताचा पहिला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरा यष्टीरक्षक आहे. २२३ व्या डावात धोनीने हा पराक्रम केलाय. यापूर्वी इंग्लंडचा अॅलेक स्टीवर्टने १३१ सामन्यात तर श्रीलंकेच्या कुमार संगकाराने १६५ सामन्यात २०० झेल टिपले होते.
धोनीने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर गप्तिलचा सुरेख झेल घेत मायदेशातील २०० वा झेल टिपला. त्यानंतर रॉस टेलरलाही त्याने झेलबाद केले. यष्टीमागील चपळ कामगिरीने धोनी नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. नुकतेच त्याने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक स्टंपिग करण्याचा विक्रम नोंदवला होता. श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या ९९ स्टंपिंगचा विक्रम मोडीत काढून त्याने नवा विश्वविक्रम रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात शंभरहून अधिक स्टंपिंग करणारा धोनी एकमेव यष्टीरक्षक आहे.
फलंदाजाला यष्टीचित करण्यात धोनी सर्वांच्या पुढे आहे. मात्र यष्टीमागे सर्वाधिक बळी मिळवण्याचा पराक्रम संगकाराच्या नावे आहे. संगकाराने ४०४ सामन्यात ३८३ झेल आणि ९९ स्टंपिंगसह एकूण ४७२, ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टच्या नावे ४२४ तर दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरने ४२४ फलंदाजांना बाद केले आहे. यष्टीमागील भन्नाट कामगिरीने सर्वाधिक फलंदाजांना बाद करणाऱ्यांच्या यादीत धोनी चौथ्या स्थानावर आहे. त्याने २८८ झेल आणि १०३ स्टंपिंगसह ३९१ फलंदाजांना बाद केले आहे.