२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेतेपदाचा दावेदार समजल्या जाणाऱ्या विराटसेनेला उपांत्य फेरीतूनच माघारी परतावं लागल्यामुळे अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला. त्यातच न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात फलंदाजांनी केलेली हाराकिरी आणि एकूण स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीचा संथ खेळ हे मुद्दे चर्चेचे ठरले. विश्वचषक संपल्यानंतर धोनीवर निवृत्तीसाठी दबाव वाढू लागला. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेल्या विनंतीमुळे धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली नाही. सध्या निवड समितीने धोनी ऐवजी ऋषभ पंत हा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असल्याचं जाहीर केलं आहे. धोनीने अधिकृतपणे आपली निवृत्ती जाहीर केली नसली तरीही, त्याला सन्मानपूर्वक क्रिकेटला अलविदा करण्याची संधी मिळायला हवी असं मत भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“धोनीने खेळावं की नाही याबद्दल मला नेमकं सांगता येणार नाही. यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून ऋषभने टी-२० संघासाठी आपली दावेदारी सादर केली आहे. त्यामुळे धोनीबद्दलचा निर्णय आता एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीला घ्यायचा आहे. मात्र धोनीला सन्मानपूर्वक निवृत्ती मिळायला हवी, तो त्याचा हक्क आहे”, अनिल कुंबळेंनी एका मुलाखतीदरम्यान आपलं मत मांडलं.

धोनीला भारतीय संघात स्थान मिळावं की नाही हा निर्णय निवड समितीने घ्यायचा आहे. ऋषभ पंतला आतापर्यंत योग्य प्रमाणात संधी मिळाली आहे, मात्र त्याच्या कामगिरीतही सातत्य नाही. जर निवड समितीला धोनी टी-२० विश्वचषकासाठी संघात हवा आहे, तर त्यांनी त्याला संधी द्यायला हवी. मात्र, जर निवड समितीला धोनी टी-२० संघात नको असेल तर त्याला स्पष्टपणे सांगण गरजेचं आहे, कुंबळे धोनीच्या संघातील स्थानाबद्दल बोलत होते. विश्वचषकानंतर विंडीज दौऱ्यात धोनीने विश्रांती घेण पसंत केलं होतं. यानंतर आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेतही धोनीची भारतीय संघात निवड झालेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni deserves proper send off says former coach anil kumble psd