नुकतीच भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन टी २० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील सामने बघण्यासाठी अनेक माजी क्रिकेटपटूनी हजेरी लावल्याचे दिसले. त्यामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचाही समावेश होतो. एजबस्टन येथील दुसरा टी सामना संपल्यानंतर धोनीने भारतीय ड्रेसिंग रूमला भेट दिली होती. शिवाय, काल (१० जुलै) ट्रेंट ब्रिज येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यातही तो रवि शास्त्री यांच्यासोबत चर्चा करताना दिसला. या दरम्यान सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो व्हायरल होत आहे. मैदानात येण्यासाठी धोनीने ऋषभ पंतचा चेहरा वापरल्याचे समोर आले आहे.

भारतीय खेळाडूंची भेट घेणे धोनीसाठी अजिबात सोपे नव्हते. स्टेडियममध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याला शेकडो चाहत्यांचा सामना करावा लागणार होता. चाहत्यांच्या नजरेपासून वाचण्यासाठी धोनीने युक्ती करून ऋषभ पंतचा मास्क घातला. मात्र, चाहत्यांच्या हुशारीसमोर धोनीची ही युक्ती उपयोग आली नाही. काही चाहत्यांनी त्याला लगेच ओळखले. पंतचा मुखवटा घातलेला धोनीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महेंद्रसिंह धोनी सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्याने सुनील गावसकर यांच्यासोबत विम्बल्डन स्पर्धेचा आनंद लुटला. त्यानंतर त्याने सलग दोन दिवस भारतीय संघाची भेट घेतली आणि टी २० सामने बघितले. दुसऱ्या सामन्यानंतर बीसीसीआय आणि ऋषभ पंतने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर धोनीच्या भेटीचे फोटो शेअर केले होते.

Story img Loader