भारतीय एकदिवसीय संघाचा यष्टीरक्षक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी लाखो क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. ज्यावेळी धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पदार्पण केले त्यावेळी त्याच्या लांब हेअर स्टाईलने तरुणाई घायाळ झाली. जस जसा तो कारकिर्दीत बहरत गेला तशी त्याची स्टाईलही बदलत गेली. तो करेल ती स्टाईल तरुणाई देखील अंगीकारताना दिसली. मात्र, धोनीवर अद्यापही इतर क्रिकेटर्संप्रमाणे टॅटूची क्रेझ दिसलेली नाही आणि कदाचित दिसणारही नाही. कारण त्याला कारणही तसेच आहे. मैदानात आपल्या भात्यातील हेलिकॉप्टर नावाच्या फटक्याने गोलंदाजांच्या मनात धास्ती निर्माण करण्याची क्षमता असणारा धोनी सुईला फारच घाबरतो. एका इंग्रजी संकेत स्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांची सुई असो अथवा टॅटू गोंधणाऱ्या कलाकाराचे यंत्र असो धोनीला या गोष्टीची फारच भीती वाटते. त्यामुळेच त्याने आतापर्यंत अंगावर टॅटू गोंधलेला नाही.
भारतीय कर्णधार विराट कोहली, अजिंक्य राहणे किंवा सलामीवीर शिखर धवन यांच्याकडे पाहिले तर त्यांच्या अंगावर परदेशी खेळाडूप्रमाणे टॅटू एक स्टाईल स्टेटमेंटचा भाग झाल्याचे दिसून येते. मात्र धोनी याला अपवाद आहे. संघातील सहकारीच नव्हे तर धोनीची पत्नी साक्षी हिने देखील धोनीवरील प्रेम टॅटूतून व्यक्त केले आहे. साक्षीने ‘माही’ असा टॅटू तिच्या मानेवर गोंदवून धोनीला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हजेरी लावण्यासाठी आल्याचे दिसले होते. मात्र धोनीला सुईची अॅलर्जी असल्यामुळे साक्षीसाठी किंवा स्टाईल म्हणून धोनी टॅटू गोंधून घेईल, असे सध्या तरी वाटत नाही.
२००७ मधील विश्वचषकात बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेटवर अंधाराचे ढग निर्माण झाले. याच काळात धोनीने भारतीय संघाची कमान हाती घेतली. नव्या दमाच्या खेळाडूंना घेऊन त्याने संघाची मजबूत बांधणी केली. त्यामुळे धोनी आजही नेतृत्वाशिवाय खेळतानाही त्याच्या चाहत्यांमध्ये किंचितही फरक पडलेला नाही.