Mahendra Singh Dhoni Cheated of 15 Crores : दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांच्याविरुद्ध रांची कोर्टात केस दाखल केली आहे. दिवाकरने २०१७ मध्ये धोनीसोबत जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी करार केला होता. त्याच्या अटींचे पालन करण्यात ते अयशस्वी ठरला. धोनीने १५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे.
इंडिया टुडेने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, करारामध्ये अर्का स्पोर्ट्सला फ्रँचायझी फी भरणे आणि नफा शेअर करणे बंधनकारक होते, परंतु तसे केले गेले नाही. अनेक प्रयत्न करूनही, कराराच्या अटी व शर्तींकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्ट २०२१ रोजी अर्का स्पोर्ट्सला दिलेले अधिकार पत्र रद्द केले.
१५ कोटींहून अधिक नुकसानीचा दावा –
याशिवाय महेंद्रसिंग धोनीच्या वतीने अर्का स्पोर्ट्सला अनेक कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. विधी असोसिएट्सच्या माध्यमातून धोनीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दयानंद सिंग यांनी अर्का स्पोर्ट्सने आपली फसवणूक केल्याचा दावा केला आहे, असे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. त्यामुळे १५ कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.
दुबईत नवीन वर्ष साजरे केले –
महेंद्रसिंग धोनी नुकतेच दुबईमध्ये नवीन वर्ष साजरे करुन मायदेशी परतला आहे. एमएस धोनी कुटुंब आणि मित्रांसोबत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना दिसला होता. भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतही या प्रवासादरम्यान धोनीबरोबर दिसला. धोनीने दुबईमध्ये मित्र आणि कुटुंबियांसोबत ख्रिसमसही साजरा केला. १९ डिसेंबर रोजी प्रथमच यूएईमध्ये आयोजित आयपीएल २०२४ मिनी-लिलावासाठी दुबईत आल्यानंतर पंतने एमएस धोनीची भेट घेतली होती.