भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर असताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मात्र या दौऱ्यातून माघार घेतली होती. तो भारतीय जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालत होता. ३१ जुलैपासून त्याने काश्मीर खोऱ्यातील १०६ TA बटालियन (पॅरा) सोबत भारतीय सैन्यात सेवा देण्यास सुरू केली होती. सुमारे २ महिन्यांनंतर तो स्वगृही परतला. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतेल, असे वाटत होते. पण आता नोव्हेंबरपर्यंत धोनी क्रिकेटपासून दूर राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर महेंद्रसिंग धोनीवर चांगलाच भडकला आहे.

जर भारताच्या संघाकडून खेळायचे असेल तर कोणती मालिका खेळायची आणि कोणती मालिका खेळायची नाही त्याची निवड धोनीने करू नये. अशा शब्दात त्याने धोनीवर टीका केली आहे. “निवृत्ती स्वीकारणे हा प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक निर्णय आहे. मी प्रत्येकाच्या निर्णयाचा आदर करतो. पण मला असं वाटतं की आता निवड समिताच्या सदस्यांनी धोनीशी चर्चा करायला हवी. त्याच्या भविष्यात काय योजना आहेत, ते विचारायला हवं. पण एक मात्र नक्की की जर तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत आहात, तर तुम्ही कोणती मालिका खेळायची आणि कोणती मालिका खेळायची नाही याची निवड तुम्ही करणं चुकीचं आहे.” असं गंभीर म्हणाला.

आणखी वाचा- पाकिस्तानात तब्बल १० वर्षानंतर पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट

ऋषभ पंतबद्दलही गंभीरने मत व्यक्त केले. “नव्या खेळाडूवर साऱ्यांनी जरा जास्तच लक्ष केंद्रित केलं आहे. पंत सुमारे अडीच वर्षे क्रिकेट खेळत आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये दोन शतकं ठोकली आहेत. त्यामुळे त्याची कोणाशीही तुलना करण्याची घाई करू नये. संघ व्यवस्थापन त्याला चांगल्या प्रकारे पाठिंबा देत आहे. त्याचे भविष्य खूप उज्ज्वल असेल, असा विश्वास गंभीरने व्यक्त केला.

Story img Loader