MS Dhoni House with Number 7 and Helicopter shot Video: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरश: काहीही करण्यासाठी तयार होतात, याचा प्रत्यय आपण अनेकदा पाहिलाच आहे. भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे रांचीमध्ये एक उत्कृष्ट फार्म हाऊस आहे. मात्र, यादरम्यान, महेंद्रसिंग धोनीचा हरमू येथील बंगला आता सेल्फी पॉईंट ठरला आहे. महेंद्रसिंग धोनीने आता आपल्या हरमू येथील घराला ७ नंबर दिला आहे आणि त्याचा प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेंद्रसिंग धोनीचं सातव्या क्रमांकाशी मोठं कनेक्शन आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आयपीएल, महेंद्रसिंग धोनीने नेहमीच ७ नंबरची जर्सी घातली आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, महेंद्रसिंग धोनीने आपल्या हरमू येथील घराला आता ७ नंबर दिला आहे. धोनीचे घर आता चाहत्यांसाठी सेल्फी पॉइंट बनलं आहे. महेंद्रसिंग धोनीच्या बंगल्यावर सातचा मोठा आकडा दिसत आहे.

धोनीने घराला ७ क्रमांक दिला आहेच, याशिवाय घराबाहेरील मोठ्या भिंतीवर धोनीने खेळलेले क्रिकेट शॉट्स आणि विकेटकीपिंग ॲक्शन्स पाहायला मिळत आहेत. धोनीचा आवडता हेलिकॉप्टर शॉट घराबाहेरील भिंतीवरही पाहायला मिळत आहे. यासह धोनीचं घर आता सेल्फी पॉईंट झाला आहे.

२००९ मध्ये झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने धोनीला हरमू येथे घर बांधण्यासाठी जमीन दिली होती. या प्लॉटच्या मागे दुसरा प्लॉट खरेदी करून धोनीने रांचीमध्ये पहिले घर बांधले, ज्याचे नाव शौर्य असे ठेवले आहे. मात्र, धोनी आता रांचीच्या सिमलिया येथे त्याच्या आलिशान फार्म हाऊसमध्ये राहतो. धोनीने नेहमीच ७ नंबरची जर्सी घातलेली आपण पाहिली आहे.

धोनीच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने डिसेंबर २०२३ मध्ये ७ नंबरची जर्सी निवृत्त केली होती. आता कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला ७ क्रमांकाची जर्सी घालता येणार नाही. धोनीचा जन्म ७ जुलै रोजी झाला होता. जुलै हा वर्षाचा सातवा महिनाही असतो. याचमुळे धोनीने कायम ७ क्रमांकाची जर्सी घातली आहे. याशिवाय धोनीचा सेव्हन नावाचा एक लाईफस्टाईल ब्रँडदेखील आहे. महेंद्रसिंग धोनी आता आयपीएल २०२५ मधून क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni gives jersey number 7 to his house helicopter shot printed on wall his residence becomes selfie points for fans bdg